तेलंगणात उष्माघाताचे 167 बळी, मछलीपट्टणम येथे सर्वाधिक तापमान

0

हैदराबाद । देशभर पसरलेली उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. त्यातही तेलंगणा येथे उष्माघाताने एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल 167 जणांचा बळी गेल्याची नोंद झाली. आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टनम येथे शुक्रवारचे तापमान चक्क 47.3 अंश सेल्सियसवर पोहोचले होते. दिल्लीत सुद्धा पारा 42 अंश सेल्सियसपर्यंत गेला. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने उष्माघाताने 167 जणांचा जीव गेला अशी माहिती दिली. मात्र, सरकारने त्यास अद्याप अधिकृत दुजोरा दिला नाही. प्रत्येक प्रशासकीय विभागात 3 सदस्यीय समिती स्थापित करण्यात आली आहे. ते उष्माघात आणि त्यामुळे होणार्‍या जीवितहानीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

तेलंगणातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 40 पेक्षा अधिक आहे. त्यातही भद्राचलम, रामागुंडम आणि नालगोडा येथे सर्वाधिक उष्णता जाणवत आहे. या राज्यात कमाल तापमान 46 अंश सेल्सियस इतके आहे. तटवर्ती आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भासह तामीळनाडूतील काही भागांमध्ये प्रचंड तापमान आहे. मछलीपट्टनम येथे सर्वाधिक 47.3 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले आहे.

ओडिशातसुद्धा प्रचंड उष्णता जाणवत आहे. काही भागांत तापमान कमी झाले तरीही मलकानगिरी येथे शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक 45.4 अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. राजस्थानातील श्रीगंगानगर आणि कोटा हे सर्वात उष्ण जिल्हे ठरत आहेत. या दोन्ही शहरांमध्ये कमाल तापमान 45.1 अंश सेल्सियस एवढे आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची सुद्धा नोंद झाली.

हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये कमाल तापमान सामन्यपेक्षा अधिक आहे. हरियाणातील हिसार येथे सर्वाधिक 44 अंश सेल्सियस तापमानाची तर, पंजाबमध्ये अमृतसर येथे सर्वात जास्त 40.3 अंश सेल्सियस एवढे तापमान आहे. उत्तर प्रदेशात अलाहबाद आणि बांदा सर्वात उष्ण शहर ठरत आहेत. दोन्ही शहरांमध्ये तापमान सरासरी 44 अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले आहे. बिहारच्या गया येथे कमाल तापमान 42.8 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले आहे.