हैदराबाद । आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या वडिलांनी तरुणाचा खून केल्याची घटना नालगोंडा जिल्ह्यातील लिंगराजूपल्ली येथे उघडकीस आली. अंबोजी नरेश असे त्या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर तुम्मला स्वाथी असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. दरम्यान, नरेश बेपत्ता झाल्याने त्याची पत्नी स्वाथीनेही गळफास घेत आत्महत्या केली.
अंबोजी नरेश या दलित तरुणाचे श्रीनिवास रेड्डी याच्या तुम्मला स्वाथी या मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमाला रेड्डी याचा विरोध होता. त्यामुळे नरेशने स्वाथीला मुंबईत नेले. तेथे गेल्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यानंतर रेड्डीने नरेश आणि स्वाथीला त्यांचे लग्न मान्य असल्याचे सांगत बोलावून घेतले. त्याने नरेशला पेटवून देत त्याचा लिंगराजूपल्ली परिसरात खून केला. नरेश बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. त्यासह पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यासह त्याच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पोलिसांना याप्रकरणाचा कसून तपास करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी स्वाथीही 18 मेला न्यायालयात हजर होती.
पोलिसांनी गेल्या 2 आठवड्यांपासून श्रीनिवास रेड्डीची कसून चौकशी केली. यात त्याने नरेशचा खून केल्याची कबुली दिली. त्यासह त्याचा मृतदेह मुसी नदीत फेकून दिल्याचेही स्पष्ट केले. यात त्याला त्याचा भाऊ अन् मुलाने मदत केल्याची कबुलीही त्याने दिली.
या घटनेची माहिती मिळताच स्वाथीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. लहानपणापासूनच्या प्रेमाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राचकोंडा पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी उपायुक्त वेंकटेश्वर राव यांची याप्रकरणी तपासी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच याप्रकरणी माहिती देणारास 50 हजार रुपयाचे बक्षीसही जाहीर केले आहे.