तेलुगु टायटन्स प्ले ऑफ लाइन ओलांडणार..?

0

मुंबई । प्रो लीगच्या पाचव्या सत्रात इतर संघाप्रमाणे तेलुगु टायटन्स संघही यावेळी विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. लीगच्या दोन सत्रांमध्ये प्ले ऑफमध्ये स्थान मिळवूनही या संघाला ती लाइन ओलांडता आलेली नाही. त्यामुळे यावेळी या संघाला वेगळ्या रणनीतीसह मैदानात उतरावे लागेल. यावेळी संघात नवीन खेळाडू असल्यामुळे कामगिरीतही बदल होईल अशी अपेक्षा संघ व्यवस्थपनाची असेल. लीगच्या पहिल्या सत्रात या संघाने अनेक चढउतार पाहिले. या सत्रात संघ पाचव्या स्थानावर होता. दुसर्‍या सत्रात संघाची कामगिरी खूपच उंचावली. या सत्रात संघाने प्ले ऑफमध्ये धडक मारली. त्यावेळी संघाला अंतिम फेरीने हुलकावणी दिली असली तरी साखळी लढतीतील गुणतालिकेत संघ दुसर्‍या क्रमांकावर होता.

तिसर्‍या सत्रात पुन्हा संघाची कामगिरी घसरली. यावेळी संघाची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली. चौथ्या सत्रात संघाने पुन्हा जोरदार मुसंडी मारली खरी पण तेव्हाही त्यांना प्ले ऑफची लाईन ओलंडता आली नाही.तेलुगु टायटन्स संघाने यावेळी झालेल्या लिलावात इराणच्या फरहाद रहीमी मिलघरदानला 29 लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. राहुल चौधरी आणि निलेश साळुंखेला संघात कायम ठेवले आहे. निलेशला करारबद्ध करण्यासाठी टायटंसने 49 लाख रुपये खर्च केले आहेत. विकासकुमारसाठी तेलुगु टायटंस संघाने 25 लाख रुपये मोजले.

राहुल चौधरीवर मदार
चढाईपटू राहुल चौधरी हा या संघाची ताकद आहे. राहुलच्या चतुरस्त्र खेळामुळे हा संघ दोन वेळा जवळ जाऊनही विजेतेपदावर नाव कोरण्यात अपयशी ठरला होता. संघाच्या कमकुवत बचावामुळे राहुलच्या मेहनतीवर दोन्ही वेळा पाणी फेरले गेले. आता पुन्हा संघात आलेल्या निलेश साळुंखेने पहिल्या सत्रापासून छाप पाडली आहे. यावेळी संघाला त्याच्याकडून खूप अपेक्शा असतील. तीन महिने रंगणार्‍या या लीगमध्ये राकेशकुमार, परदेशी खेळाडूंच्या कोट्यातील इराणचा फरहाद रहीमी यांच्यावरही संघाची भिस्त असेल. 23 वर्षीय विनोदकुमार संघातील युवा चेहरा आहे. त्याच्यावर बचाव चांगला ठेवण्याची जबाबदारी असेल.विनोदच्या जोडीला अमित चिल्लर असेल. या संघाला बॅकलाईनच्या खेळाने खूपच धोका दिला आहे. हा कमकुवतपणा संघाला यावेळी दूर करावा लागेल.

तेलुगु टायटन्सचा संघ
चढाईपटू – राहुल चौधरी, अंकित मलिक, अतुल एम एस, अबोझार मोहाजेरमिघानी, मुनिश, निलेश साळुंखे, विकासकुमार, विक्रांत, विनोदकुमार.
बचावपटू – अमितसिंग चिल्लर, फरहाद रहिमी, रोहित राणा, सोमबीर, विनोदकुमार.
अष्टपैलु : एलंगेश्‍वरन आर, राकेशकुमार, विशाल भारद्वाज.