एनडीएतून बाहेर पडणार : अर्थसंकल्पावर चंद्राबाबू नायडू नाराज
मुंबई/हैदराबाद : आंध्र प्रदेशच्या तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) ‘एनडीए’तून बाहेर जाण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू हे अर्थसंकल्पाबाबत प्रचंड नाराज आहेत. टीडीपी पक्ष ‘एनडीए’ आघाडीतील प्रमुख घटकपक्षांपैकी एक आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडून गुरुवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानंतर चंद्राबाबू नाराज झाल्याने त्यांनी तातडीची मंत्रिमंडळाची बैठकही बोलावल्याचे समजते. दुसरीकडे, शिवसेनेने भाजपर तुटून पडण्याचे सत्र कायम ठेवले आहे. खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी आता माघार नाही. आगामी निवडणूक स्वबळावर लढणार या निर्णयाचा पुनरुच्चार केला. लोकसभा आणि विधानसभेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याच्या निर्णयापासून आम्ही मागे हटणार नाही. ‘आता धनुष्यातून बाण सुटलाय, त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही’, असे खा. राऊत म्हणाले.
राजस्थानचे निकाल हा इंटरव्हल
गुजरात विधानसभा निवडणूक हा ट्रेलर होता, तर गुरुवारी जाहीर झालेले राजस्थानमधील पोटनिवडणुकांचे निकाल हा इंटरव्हल होता. आता 2019 मध्ये खरा चित्रपट पाहायला मिळेल, असे संजय राऊत म्हणाले. खा. राऊत यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावरही ताशेरे ओढले. जेटलींनी सादर केलेला अर्थसंकल्प फक्त कागदावरच खूप चांगला वाटतो. देशभरात शेतकरी आत्महत्या करत आहेत, याचा उल्लेख त्यांनी यावेळी बोलताना केला.
आंध्र प्रदेशला अपेक्षित वाटा मिळाला नाही!
अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला अपेक्षित वाटा मिळालेला नाही. म्हणून तेलगू देसममध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यावरून भाजपसोबत असलेली युती तोडायचा विचार तेलगू देसम पक्षाचे नेते गांभीर्याने करत आहेत. आम्ही आता युद्ध छेडायच्या तयारीत आहोत. आता आमच्यासमोर केवळ तीन पर्याय आहेत. एक म्हणजे प्रयत्नपूर्वक युती कायम ठेवणे, दुसरे म्हणजे आमच्या खासदारांनी राजीनामा देणे किंवा तिसर्या पर्यायाचा अवलंब करायचा झाल्यास आम्हाला भाजपसोबतची युती तोडावी लागू शकते, अशी प्रतिक्रिया टीडीपी खासदार टीजी व्यंकटेश यांनी व्यक्त केली.