तेलुगू देसम एनडीएतून बाहेर!

0

केंद्र सरकारवर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करणार
शिवसेना तठस्थ? : काँग्रेससह डाव्यांचा अविश्‍वास प्रस्तावास पाठिंबा

नवी दिल्ली : तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अखेर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तून बाहेर पडत असल्याची घोषणा अमरावती येथे केली. त्यानंतर लगेचच शुक्रवारी वायएसआर काँग्रेसच्यावतीने केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरुद्ध अविश्‍वास ठरावाची नोटीस लोकसभेच्या सभापतींना सादर करण्यात आली. या प्रस्तावास तेलुगू देसमच्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे. या संकटातून वाचण्यासाठी मोदी सरकारकडे पुरेसे बहुमत असले तरी, डावे पक्ष व काँग्रेसने या अविश्‍वास ठरावास आपला पाठिंबा दर्शविला आहे. चार वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच मोदी सरकारविरुद्ध अविश्‍वास ठराव प्रस्ताव दाखल होत आहे. भाजपवर टीका करणार्‍या शिवसेनेने मात्र तठस्थ राहण्याची भूमिका घेतली असल्याचे विश्‍वासनीय सूत्राने सांगितले. आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. परंतु, त्यांनी ते पाळले नाही म्हणून आपण अविश्‍वास दर्शवित असल्याचे नायडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. टीडीपीसह वायएसआर काँग्रेसचा हा प्रस्ताव तूर्त अनिर्णीत ठेवण्यात आलेला आहे. दुसरीकडे, पीएनबी घोटाळासह इतर मुद्द्यांवर लोकसभा व राज्यसभेत जोरदार गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते.

एनडीएतून बाहेर पडण्याचे भाजपला पत्र!
भाजपने आश्‍वासन फिरविल्यानंतर तेलुगू देसम पक्षाच्या दोन मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून 9 मार्चरोजी राजीनामे दिले होते. पक्षाची भूमिका स्पष्ट करताना, तेलुगू देसमचे नेते थोटा नरसिम्हा यांनी सांगितले, की भाजपने आंध्रप्रदेश जनतेचा विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे आमच्या नेत्यांची तात्विक भूमिका लक्षात घेता, आम्ही एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा करत आहोत. तसेच, वायएसआर काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्‍वास प्रस्तावाला पाठिंबा देत आहोत. एनडीएतून बाहेर पडण्याचे आणि अविश्‍वास ठरावास पाठिंब्याचे पत्र आम्ही सकाळी साडेनऊ वाजता लोकसभेच्या सभापतींना दिले आहे, असेही नरसिम्हा यांनी सांगितले. तसेच, भाजपच्या नेत्यांनाही पत्राद्वारे आमचा निर्णय कळविला असल्याचेही त्यांनी सांगितले. 54 खासदारांच्या स्वाक्षरीचा अविश्‍वास प्रस्ताव सभापतींकडे सादर करण्यात येणार असून, प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या खासदारांच्या सह्यांची जुळवाजुळव आम्ही करत आहोत. 50 खासदारांचा पाठिंबा असेल तर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करता येतो, असे तेलुगू देसमचे अन्य नेते रमेश यांनी सांगितले.

लोकसभेत भाजप मजबूत
लोकसभेत तेलुगू देसम पक्षाचे 16 खासदार असून, वायएसआर काँग्रेसचे नऊ खासदार आहेत. या अविश्‍वास प्रस्तावास काँग्रेससह डाव्या पक्षांनी पाठिंबा दर्शविलेला आहे. आंध्रप्रदेशातील राजकीय पक्षांनी हा प्रस्ताव आणला तर आम्ही त्यांना सभागृहात पाठिंबा देऊ, अशी घोषणा कम्युनिस्ट पक्षाचे नेते मोहम्मद सलीम यांनी पत्रकारांशी बोलताना केली. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खारगे यांनीही या प्रस्तावास काँग्रेस पाठिंबा देत असून, तेलुगू देसम व वायएसआर काँग्रेसने मात्र या मुद्द्यावर राजकारण करू नये, अशी सूचना खारगे यांनी केली आहे. या प्रस्तावाबाबत केंद्रीयमंत्री अनंत कुमार यांनी मात्र खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अख्खा देश मोदी सरकारवर विश्‍वास व्यक्त करत आहे. तसेच, आमच्यावर सभागृहाचादेखील बहुमताने विश्‍वास आहे. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असून, आम्ही असा ठराव आलाच तर त्याला सामोरे जावू, असेही अनंत कुमार यांनी सांगितले. 536 सदस्यीय लोकसभेत भाजपकडे 274 सदस्यांचे संख्याबळ असून, एनडीएत सहभागी अन्य सदस्यांचे 53 खासदार आहेत. त्यामुळे हा अविश्‍वास प्रस्ताव बारगळला जाण्याची शक्यता अधिक आहे.

लोकसभेतील एनडीएची स्थिती
274 : भाजप
18 : शिवसेना
06 : लोकजनशक्ती पक्ष
04 : अकाली दल
03 : आरएलएसपी
02 : जनता दल (संयुक्त)
02 : अपना दल
01 : पीडीपी

310 : एकूण