नवापूर: विसरवाडी-धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बर्डीपाडा गावाच्या शिवारात तेल वाहतूक करणारा टँकर उलटून चालक जखमी झाला आहे. टँकर व तेलाचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर लिंगनघाट (नागपूर ) येथुन कपाशीचे कच्चे खाद्य तेल कढी(गुजरात) येथे टँकर (क्र जी.जे 12 बी.व्ही. 5804) हा वाहतूक करीत असताना नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा गावाच्या शिवारात टँकर चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या खाली पलटी झाले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास घडला.
या अपघातात टँकर पलटी होऊन टँकरची टाकी फुटल्याने टँकरमध्ये असलेले कपाशीचे कच्चे खाद्यातील जमिनीवर वाहून गेले. या गटात टँकर चालक मंगाराम तकाराम जाट(24) रा.बाडमेर, राजस्थान हा जखमी झाला. त्याच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आला. टँकरमधील सर्व तेल वाहून गेल्याने तेलाचे तसेच टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच शेतात ठेवलेल्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या साह्याने उलटलेला टँकर सरळ करण्यासाठी प्रयत्न केले.