तेव्हा महाजनांना कुणी रोखले नव्हते !

गैरव्यवहाराच्या आरोपावर पालकमंत्र्यांचा टोला

जळगाव – जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांनी बहिष्कार टाकत माघार घेतली. या प्रक्रियेनंतर आमदार गिरीश महाजन यांनी गत पाच वर्षात जिल्हा बँकेतील चेअरमन, व्हाइस चेअरमन आणि संचालकांनी स्वत:च्या संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज घेऊन गैरव्यवहार केल्याचा खळबळजनक आरोप केला. यासंदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांची बँक आहे. त्यांचे आभार मानतो त्यांनी शेतकर्‍यांची बँक आमच्या ताब्यात दिली. त्यांनी केंद्र सरकारला सांगुन शेतकर्‍याला जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करावे. असं कुणी अधिकार्‍यावर दडपण टाकू शकत नाही. मात्र आपला पराजय पक्का आहे, झाकली मुठ सव्वा लाखाची रहावी म्हणून त्यांनी माघार घेतली आहे. त्यांचा हात धरून कुणी त्यांना माघार घ्यायला लावली नाही. महाविकास आघाडीच्या सहा जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. जिल्हा बँकेत गत काळात आमदार महाजन संचालक होते. त्यांना कुणी रोखले नव्हते. जर वाटत असेल गैरव्यवहार झाला आहे तर त्यांनी तो बाहेर काढावा. तक्रार करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यावेळी एकनाथराव खडसे त्यांच्यासोबतच होते. पाच वर्ष सत्तेत रहायचं आणि काही बोलायचं नाही आणि आता म्हणायचं गैरव्यवहार झाला असा टोलाही ना. गुलाबराव पाटील यांनी आमदार महाजनांना लगावला.