तेहरान: युक्रेन देशाचे प्राव्सी विमान इराणची राजधानी तेहरानमध्ये कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रवासी विमानात १८० प्रवासी असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमातळाजवळ हे विमान कोसळल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. उड्डाण करताच विमानात तांत्रिक बिघाड झाला. यानंतर हे विमान कोसळलं.
उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांत अपघातग्रस्त झालेल्या विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. सध्या तपास पथक दुर्घटनास्थळी पोहोचल्याची माहिती तेहरानच्या नागरी उड्डाण विभागाचे प्रवक्ते रेझा जफरझादेह यांनी दिली आहे. अपघातग्रस्त विमान युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं आहे. या विमानानं बुधवारी सकाळी उड्डाण केलं. मात्र काही वेळातच विमानानं हवाई वाहतूक नियंत्रणाला माहिती पाठवणं बंद केलं. फ्लाईटरडार२४ या संकेतस्थळानं हे वृत्त दिलं आहे. मात्र अद्याप या वृत्ताला युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.
इराणनं त्यांच्याच देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतरच्या अवघ्या काही तासांत युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमान कोसळल्याची घटना घडली. कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. यामध्ये अमेरिकेचे ३० सैनिक मारले गेल्याचा दावा इराणनं केला. या हल्ल्याला अमेरिकेनं दुजोरा दिला. या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढला आहे.