‘ते’ उपोषणकर्ते अत्यवस्थ

0

बारामती । भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावरील सिव्हील कामगारांना कायम करून घेण्यासाठी त्यांनी गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषाण सुरू केले आहे. आंदोलनाचा शनिवारी सहावा दिवस होता. उपोषणामुळे कामगारांची प्रकृती खालावली आहे. छत्रपती कारखान्यातील कामगारांना कायम सेवेत करून घेण्याचा निर्णय होत असताना आम्हाला का डावलले जात आहे. आमचा हक्क असतानादेखील आमच्यावर हा अन्याय होतो आहे, अशी या कामगारांची तक्रार आहे. या पेट्रोल पंपावर तेरा कामगार काम करतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे कामगार उपोषणास बसलेले आहेत. उपोषणामुळे कामगारांची प्रकृती खालावली आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आंदोलनकर्त्या कामगारांची भेट घेतली आहे. ही भेट पहिल्या दिवशी झाल्यामुळे कामगारांना आशा निर्माण झाली होती की, याबाबत लवकरच निर्णय होईल. बाळासाहेब पाटील यांनी सहकार खात्याची परवानगी घेऊन निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. तातडीने निर्णय घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नसल्याचे या उपोषणकर्त्यांनी सांगितले. या आंदोलनाला भाजप युवा मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष गजानन वाकसे तसेच भाजप सहाकर आघाडीचे बापूराव सोलनकर, संपतराव टकले यांनी पाठिंबा दिला आहे.

28 वर्षांपासून रोजनदारीवर काम
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर सुमारे 28 वर्षापासून हे कामगार सिव्हील पद्धतीने रोजनदारीवर काम करीत आहेत. गेली 28 वर्ष आपण कारखान्यात कायमस्वरुपी होऊ या आशेवर काम करीत आहेत. कारखान्याने रोजनदारीवर काम करणार्‍या अनेक कामगारांची यादी करून त्यांना कायम करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. पेट्रोल पंपावरील कामगारांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आमच्यावर हा सरळ अन्यायच झाला आहे. याला वाचा फोडण्यासाठी हे कामगार कारखान्याच्या मुख्य कार्यालयाच्या गेटवर उपोषणास बसलेले आहेत.