ते जोडपं धनुषचे आई-वडील नाहीच

0

चेन्नई। दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार आणि सुपरस्टार रजनिकांतचा जावई धनुष याचे आई-वडील असल्याचा दावा करणार्‍या दाम्पत्याचा भांडाफोड झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयात गाजत असलेले हे प्रकरण आता संपले आहे. कारण धनुषने ही केस जिंकली असून धनुष आपला मुलगा असल्याचा दावा करणारे दाम्पत्य खोटे ठरले आहे. त्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. धनुष हा आपला तिसरा मुलगा असून तो अकरावीत असताना हॉस्टेलमधून पळून गेला होता, असे या दाम्पत्याने नोव्हेंबर 2016 मध्ये सांगितले होते.

तामीळनाडूमधील एका वयस्कर जोडप्याने आपणच धनुषचे खरे आई-वडील असल्याचा दावा केला होता. थिरुप्पुवनम गावातील 65 वर्षीय कथिरेसन आणि 53 वर्षीय मीनाक्षी यांनी धनुष आपला मुलगा असल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली होती. तसेच त्याने आम्हाला महिन्याला उदरनिर्वाहासाठी 65 हजार रुपये द्यावेत, अशीही मागणी केली होती. धनुषने आणि धनुषच्या वकिलांनी मात्र हा पैसे उकळण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचे सांगितले होते.

त्यांनी दावा केला होता की, चेन्नईत जाऊन सिनेजगतात काम करण्यासाठी धनुषने लहानपणीच घर सोडले होते. आम्ही शोध घेऊनही तो सापडला नव्हता. मात्र, सिनेमामध्ये दिसल्यानंतर आम्ही त्याला ओळखले, असेही त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. इतकेच नाहीतर धनुषच्या गळ्याच्या उजव्या बाजूला एक तीळ आहे, तर उजव्या मनगटावर व्रण आहे, असा दावा दाम्पत्याने केला होता. या दोन्ही जन्मखुणांविषयी शाळा हस्तांतरण दाखल्यात माहिती असल्याचेही त्यांनी म्हटले होते. 28 फेब्रुवारीला सरकारी डॉक्टरांकडून धनुषच्या शरीरावरील जन्मखुणांची तपासणी झाली. डीएनए चाचणीला धनुषने नकार दिला होता, मात्र धनुषच्या शरीरावर कोणत्याही जन्मखुणा आढळल्या नाहीत. गळ्यावरील तीळ लेसर तंत्रज्ञानाने काढून टाकता येऊ शकतो. मात्र, व्रण हटवता येऊ शकत नाहीत, असं डॉक्टरांनी स्पष्ट केले होते.