‘ते’ पदक विकण्याचा खाशाबा जाधवांच्या कुुटुंबीयाचा इशारा

0

मुंबई। फिनलंडची राजधानी हेलंसिकीमध्ये 1952 मधील ऑलिम्पिकमध्ये देशाला कुस्तीमध्ये पहिले वैयक्तिक कांस्यपदक जिंकून देणार्‍या खाशबा दादासाहेब जाधव यांच्या कुटुंबीयांनी राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे त्या ऐतिहासीक पदकाचा लिलाव करण्याचा इशारा दिला. या पदकाच्या लिलावातून मिळणारी रक्कम खाशबा जाधव यांच्या मूळगावी असलेल्या कुस्ती अकादमीसाठी वापरण्यात येणार आहे. खाशाबा जाधव यांच्या मूळगावी 65 वर्षांपूर्वी कुस्ती अकादमी सुरु करण्यात आली आहे. ही अकादमी जागतिक दर्जाची बनवण्यासाठी 2009 मध्ये राज्यशासनाने निधीही मंजूर केला आहे. मात्र, आठ वर्षांनंतरही राज्यशासनाकडून या अकादमीला निधी देण्यात आलेला नसल्यामुळे जाधव कुटुंबीयांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव यांनी सांगितले.

शासनाला इशारा
अकादमीसाठी मंजूर केलेला निधी मिळावा म्हणून आता जाधव कुटुंबीयांनी शासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. खाशाबा जाधव यांचे 14 ऑगस्ट 1984 रोजी वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. यंदा त्यांची 33 वी पुण्यतिथी आहे. 14 ऑगस्टपर्यंत शासनाने त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर पदकाचा लिलाव पुकरण्याबरोबर 15 ऑगस्टपासून जाधव कुटंबिय आणि गावकरी आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा रणजीत जाधव यांनी दिला.

पदरी निराशाच
या अकादमीसाठी राज्य शासनाने 2009 मध्ये सुमारे 1 कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. पण त्यानंतर एकही पैसा अकादमीला देण्यात आलेला नाही. या संदर्भात शासनाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला, अधिकार्‍याच्या भेटीगाठी घेण्यात आल्या पण पदरात काहीच पडलेले नाही. आता हे प्रकरण शासनाने बासनातच गुंडाळल्याचे दिसते. जागतिक दर्जाची अकादमी बनवण्यासाठी आखण्यात आलेले खर्चाचे अंदाजपत्रक आता दुप्पट झाले आहे. असे रणजीत जाधव यांनी सांगितले.