ते पैसे फुटबॉलच्या विकासासाठी खर्च करा

0

नवी दिल्ली । फुटबॉल खेळाची जागतिक पालक संघटना असलेल्या फिफाला 17 वषार्ंखालील विश्‍वचषक स्पर्धेचा रितसर उद्घाटन सोहळा आयोजित करण्याची भारत सरकारची कल्पना पसंत पडलेली नाही. या कार्यक्रमासाठी होणारा खर्च या खेळाच्या विकासासाठी करावा अशी विनंती फिफाने क्रीडा मंत्रालयाला केली आहे. फिफातर्फे आयोजित केल्या जाणार्‍या कुठल्याही स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होत नाही, असे फिफाचे पदाधिकारी सुरूवातीपासून सांगत आलेले आहेत. मात्र, या विश्‍वचषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन व्हायला पाहिजे या मागणीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालय अडून बसले आहे. विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात होण्याच्या एकदिवसआधी 5 ऑक्टोबरला किंवा 6 ऑक्टोबर रोजी पहिल्या सामन्याच्या काही तास आधी उद्घाटन समारंभ करण्याचे क्रीडा मंत्रालयाचे प्रयत्न आहेत.

उद्घाटन समारंभासाठी फिफा अनुत्सुक
यासंदर्भात फिफाचे स्पर्धाप्रमुख जॅमी यार्जा म्हणाले की स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाबाबत विचार करण्यात आलेला नाही. फिफा आणि फिफा विश्‍वचषक स्पर्धेची स्थानिक आयोजन समिती स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून भारत सरकारशी समन्वय साधून आहे. उद्घाटन समारंभ आयोजित करण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या उत्सुकतेबाबत फिफाला कल्पना देण्यात आली. यार्जा म्हणाले की, मागील स्पर्धांचा विचार आणि खेळांचे हित डोळ्यासमोर ठेवून अस वाटते की उद्घाटन समारंभासाठी खर्च करण्यात येणारा निधी युवा खेळाडू आणि या खेळाच्या विकासासाठी वापरला जावा. भारतीय फुटबॉल महासंघाने आखलेल्या भविष्यातील योजनांसाठी ते पोषक असेल.