मुंबई:- ‘ते’ म्हणतील तेंव्हा गुन्हेगार हा गुन्हेगार ठरतो आणि ते म्हणतील तेंव्हा त्याचे शुद्धीकरण होते. याचा अर्थ ते म्हणतील तेंव्हा वाल्या ते म्हणतील तेंव्हा वाल्मिकी होईल, असा खोचक निशाणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव घेता लगावला. ना. रवींद्र वायकर यांच्या बंगल्यात ‘शिवालय’ या शिवसेनेच्या नव्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशासबंधी पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, लीलाधर डाके, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, ना. रवींद्र वायकर, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.
महाराष्ट्रभर शेतकऱ्यांशी संवाद साधणार
यावेळी उध्दव ठाकरे यांनी सातबारा कोरा झालेल्या 40 लाख शेतकऱ्यांची यादी तसेच 89 लाख कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची यादी देखील सरकारकडे मागणार असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी 9 जुलै नंतर पुन्हा मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईच्या शेतकऱ्यांवर बोलताना ठाकरे म्हणाले की, जर खरचं शेतकरी असतील तर त्याची खातरजमा सरकारने करावी. शेतकरी कर्जमाफीसाठी पावसाळी अधिवेशनात मोर्चा आमची संतुष्टी झाली असल्यामुळे काढला जाणार नाही मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच सरकारवर दबाव आणला जाईल, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
सण आधी, कायदे नंतर!
पाऊस सुरू होताच हिंदूंचे सण येतात. दरवेळेला वातावरण तापते. जीव मुठीत घेऊन हिंदूंना सण साजरे करावे लागतात मात्र सुरक्षेवर तोडगा निघत नाही. कायदे नंतर आलेत, सण त्याआधीपासून आहेत असे ठाकरे यावेळी म्हणाले. सायलेंट झोनमुळे गणपती उत्सवावर गंडांतर आले असल्याचे ते यावेळी म्हणाले. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत यासंबंधी बैठक असून यात तोडगा निघाला नाही तर उत्सव साजरा करण्याबाबत शिवसेना आपला निर्णय घेईल, असे ठाकरे म्हणाले. दरवेळेला, हिंदूंचे उत्सव आले की नियम मशिदीच्या भोंग्याबद्दल काय? अतिरेक्यांशी चर्चा होते मग सणाबाबत चर्चा का नको? असे सवाल यावेळी त्यांनी शासनाला उद्देशून केले.
जकातनाक्याऐवजी पर्यायी व्यवस्था द्या
भाजपा नगरसेवकाला मारहाण झाल्याबद्दल माहिती नसल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. जीएसटी नंतर जकात नाके बंद झाल्यामुळे मनपा चालविणे अवघड झाले असते. मुंबई मनपाला थांबवून न ठेवता काम सुरू राहावे म्हणून निर्णय केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली तसेच राज्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली. यानंतर सुधारणा आदेश दिले व मनपासाठी पहिल्या टप्प्यातील चेक दिला. जकात नाके बंद झाल्यामुळे व तपासणी न झाल्यामुळे अप्रिय घटना घडू शकतात. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे तिथे सुरक्षेचे पर्याय उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.