ते हिंसा पसरवितात, आम्ही प्रेम!

0

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष देशात हिंसा पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. ते देशाला तोडण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही सर्वांना जोडतो, ते आग लावतात, आम्ही विझवतो, असे म्हणत काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. आपण एकतेचे आणि प्रेमाचे राजकारण करु, अशी ग्वाही त्यांनी दिली. शनिवारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल यांनी पहिल्या भाषणात आपली पुढील दिशा कोणती असेल यावर भाष्य केले. शनिवारी त्यांचा पक्षाभिषेक सोहळा पार पडला. देशाच्या कानाकोपर्‍यातून काँग्रेसचे नेते दिल्लीत आले होते. फटाके फोडून आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वढेरा हेदेखील उपस्थित होते. मावळत्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत राहुल यांना अध्यक्षपदी निवड झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. यानंतर मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांनी संबोधित केले.

त्यांना रोखण्याची क्षमता काँग्रेसमध्ये!
मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भाषणापूर्वी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. राहुल गांधी भाषणाला उभे राहिल्यावर फटाक्यांचा आवाज येतच होता. याचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, एकदा आग लावली की ती विझवणे कठीण असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. मी भाजपच्या लोकांनाही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. भाजप संपूर्ण देशात हिंसेची आग पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. ते आग लावतात, आम्ही विझवतो, ते तोडतात आणि आम्ही जोडतो, ते रागावतात आणि आम्ही प्रेम करतो, असे सांगत राहुल यांनी भाजप आणि काँग्रेसची विचारधारा स्पष्ट केली. त्यांना रोखण्याची क्षमता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्येच आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तरूणांना साद घालताना राहुल म्हणाले, आगामी काळात काँग्रेस देशातील सर्वात जुना आणि तरुण पक्ष असेल असे आश्वासन मी तरुणांना देतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन एकता आणि प्रेमाची भावना असलेला देश घडवू या. द्वेषाच्या राजकारणावर प्रेमानेच मात करु या. देशात आधी जनतेच्या हितासाठी राजकारण केले जायचे, पण सध्या लोकांचा आवाज दाबण्यासाठी राजकारण केले जात आहे. भाजपशी आमचे वैचारिक मतभेद आहेत, मात्र त्यानंतरही आम्ही भाजपच्या लोकांचा आदर करतो. मात्र त्यांना काँग्रेसमुक्त भारत घडवायचा आहे. सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या सावलीत मी वाटचाल करत राहणार. काँग्रेसने देशाला पुढे नेण्याचे काम केले. मात्र, विद्यमान पंतप्रधान देशाला मागे नेत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

मुलाचे कौतुक करणार नाही, पण राहुलचा अभिमान : सोनिया
राहुल माझा मुलगा आहे, त्याचे कौतुक करणे उचित ठरणार नाही. राहुलने लहानपणापासूनच हिंसेचे अपार दुःख सोसले आहे. राजकारणात त्याने वैयक्तीक टीका सहन केली. त्यामुळे तो आणखी कणखर झाला आहे. त्याची सहनशीलता आणि दृढतेचा मला अभिमान आहे. त्याच्या नेतृत्वात परिवर्तन होईल, असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे राहुल यांच्याकडे सोपविल्यानंतर मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राहुल यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला. त्या इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या आठवणीने भावूक झाल्या. सोनिया म्हणाल्या, इंदिराजींनी मला मुलीसारखे स्वीकारले. भारताच्या संस्कृतीची ओळख करून दिली. 1984मध्ये त्यांची हत्या झाली, त्यावेळी माझी आई माझ्यापासून दुरावल्याची भावना होती. राजीव गांधी यांच्याबाबत बोलताना सोनिया म्हणाल्या, राजीवजींशी लग्न झाल्यानंतरच माझा राजकारणाशी संबंध आला, त्यापूर्वी राजकारणाशी माझा संबंध नव्हता; मात्र इंदिराजींच्या हत्येनंतर सात वर्षांनी माझ्या पतीचीही हत्या झाली आणि माझा आधार माझ्यापासून हिसकावला. गांधी घराण्यातील प्रत्येकजण या देशासाठी झिजला आहे, असेही त्यांनी सांगितले.

सोनिया निवडणूक लढविणार : प्रियांका वढेरा
सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले असतानाच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वढेरा यांनी मात्र ‘आई 2019ची निवडणूक उत्तरप्रदेशातील रायबरेलीतून लढवेल’, असे सांगून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आजपर्यंत आपण जेवढ्या महिला पाहिल्यात त्यात माझी आई हीच सर्वात धाडसी महिला आहे, असे गौरवोद्गारही प्रियांका यांनी काढले. तिने खूप संकटांचा सामना केला. राहुल गांधी हे पक्षाध्यक्ष बनत आहेत हा आपल्यासाठी गौरवाचा क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.