तैपेई : तैवानमध्ये रविवारी दि. 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला असून 170 जण जखमी झाले आहेत. एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरल्याने हा अपघात झाला.
तैपेईतील तायतूंग येथे जाणाऱ्या पुयूमा एक्स्प्रेसचे आठ डबे रविवारी रुळावरुन घसरल्याने हा अपघात झाला आहे. या रेल्वेने जवळपास 300 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघातात अनेक जण जखमी झाले असून डब्याखाली अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच रुळावरुन डबे हटवण्याचे काम सुरु असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी या अपघातावर शोक व्यक्त केला असून अपघाताची माहिती मिळताच तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने घटनास्थळी मदतकार्यासाठी 120 जवानांना पाठवले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघाताची चौकशी सुरु आहे, असे तैवानमधील रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.