तोंडाच्या कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत

0

पिंपरी-चिंचवड : तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यानंतर कर्करोगग्रस्त भाग शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढून टाकता येतो. त्यामुळे त्या जागी कर्करोगाची पुनरावृत्ती होत नाही. म्हणून तोंडाच्या कर्करोगामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाणही कमी करता येणे सहज शक्य होते, असे मत नामवंत कर्करोगतज्ज्ञ डॉ. राकेश नेवे यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले. पिंपरी-चिंचवडमधील सर्व रोटरी क्लब, पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन व समाजसेवा केंद्र आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय आरोग्य व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी निगडी क्लबच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी कोठारी, चिंचवड मोरया क्लबचे अध्यक्ष विलास भोसले, चिंचवड रोटरी क्लबचे अध्यक्ष अरविंद गोडसे, डॉ. संजीव दात्ये, पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गव्हाणे, डॉ. संजय देवधर आदी उपस्थित होते. निगडी, पिंपरी, चिंचवड, पिंपरी टाऊन, आकुर्डी, चिंचवड मोरया या सर्व रोटरी क्लबचा या व्याख्यानमालेत सहभाग होता. व्याख्यानमालेचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते.

तरुणपणातच होते आजाराची लागण
डॉ. राकेश नेवे म्हणाले की, कितीही उपचार केले तरी जखम लवकर बरी होत नाही. कधी-कधी मुखाचा कर्करोगाचे रूप कोबीच्या फुलासारखे होते. मुळात मुखाच्या कर्करोगाची लक्षणे तिसाव्या-चाळीसाव्या वर्षी दिसून येत असली तरी त्याची सुरुवात तरुणपणापासूनच झालेली असते. क्वचितच अपवाद वगळता मुखाचा कर्करोग होण्याचे मुख्य कारण हे तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे हेच आहे. तोंडाचा कर्करोग हा गाल, जीभ, ओठ, टाळू, हिरड्या, जिभेखालील भाग अशा तोंडाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. तोंडात येणारी गाठ आणि न भरणारी जखम हा कर्करोगाचा एक भाग आहे. कधी-कधी तोंडात झालेली जखम दिवसेंदिवस वाढू लागते, असे डॉ. नेवे यांनी सांगितले.

90 टक्के लोकांना व्यसने
भारतात 90 टक्के लोकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची सवय आहे. त्यामुळे मुख कर्करोगाच्या बाबतीत भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. सध्या सरकारही याबाबतची जनजागृती विविध जाहिरात, चित्रपटाच्या माध्यमातून करत आहे. सरकारनेही कर्करोग कमी होण्यासाठी पावले उचलली आहेत, असे डॉ. राकेश नेवे म्हणाले. रोटरी इंटरनॅशनल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. अविनाश भोंडवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कर्करोगाविषयी चित्रफित नागरिकांनी दाखविण्यात आली. प्रास्ताविक डॉ. विभा झुत्सी, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. शुभांगी कोठारी यांनी केले.