दुबई : सौदी अरेबियाचा अंगभर वस्त्रे परीधान करण्याचा नियम मोडल्याबद्दल एका महिलेला अटक करण्यात आलेले आहे. तिने मिनीस्कर्ट घालून रस्त्यावर चालणे हा मोठा गुन्हा केल्याबद्दल तिच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. तिचा व्हीडिओ व्हायरल झाल्यामुळे या घटनेचे मोठे चर्वितचर्वण होत आहे.
एक महिला मिनीस्कर्टवर ऐतिहासिक किल्ल्याच्या आसपास फिरत आहे. आसपास कुणीही दिसत नाही. सौदी अरेबियाच्या नाज्द या वाळवंटात ही महिला बसते, असे चित्रण व्हीडिओत आहे. विशेष म्हणजे सौदीतील अत्यंत कडव्या टोळ्या या विभागात आहेत. ट्विटर, स्नॅपचॅटवर महिलेची क्लिप आठवडाभर फिरत राहिली.
नाव उघड न केलेल्या महिलेने इस्लामला अभिप्रेत नाही वस्त्रे परिधान केली, असे पोलिसांनी सांगितले आहे. हे प्रकरण आता सरकारी वकिलांकडे गेले आहे, असे अल इखब्रिया वाहिनेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
सौदीत ५० टक्क्यांहून अधिक लोक २५ वर्षे वयाखालील आहेत. ३१ वर्षाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी मनोरंजनातील अनेक बंधने शिथिल केली आहेत. शारीरिक व्यायामाचे क्लास आणि शाळेतील खेळांमध्ये मुलींना भाग घेता येईल अशी सूट सौदी सरकारने नुकतीच दिली आहे. धार्मिक पोलिसांचे अधिकार आता नियंत्रित केले असून ते पूर्वीप्रमाणे कुणालाही अटक करू शकत नाहीत.