हा गुजरात सरकारचा हत्येचा कट : तोगडिया
झेड प्लस सुरक्षा कमी केल्याचा दावा
सुरत : विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रविण तोगडिया मंगळवारी कार अपघातातून थोडक्यात बचावले. तोगडिया यांच्या कारला एका ट्रकने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. सुरतमधील कामरेज भागात ही घटना घडली. या अपघातानंतर तोगडियांनी पुन्हा एकदा खळबळजनक आरोप गुजरात सरकारवर केला, हा केवळ अपघात नसून हत्येचा कट आहे. या कटामागे गुजरात सरकार आहे, असे तोगडिया यांनी म्हटले आहे.
ट्रकसह चालक ताब्यात
प्रविण तोगडिया त्यांच्या सहकार्यासह सुरतमध्ये एका कार्यक्रमासाठी निघाले होते. कामरेज शहराजवळ महामार्गावर त्यांची कार आली असता एका ट्रकने त्यांच्या कारला मागच्या बाजून जोरदार धडक दिली. या अपघातातून तोगडिया थोडक्यात बचावले. मात्र अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक एम. के. नायक यांनी सांगितले.
झेड प्लस सुरक्षा कमी केली
या अपघातानंतर तोगडिया यांनी त्यांच्या हत्येचा कट गुजरात सरकारने रचला असल्याचा आरोप केला. तोगडिया म्हणाले, कार बुलेट प्रुफ नाही, तसेच गुजरात सरकारने माझी झेड प्लस सुरक्षा कमी आहे. झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तीच्या वाहनाच्या पुढे एक पायलट वाहन असते. त्या व्यक्तीच्या कारच्या दोन्ही बाजूला वाहने असतात तसेच मागे एक रुग्णवाहिका तैनात असते. मात्र, गांधीनगरवरुन आलेल्या आदेशानुसार पहिल्यांदाच माझ्या ताफ्याबरोबर केवळ एकच पोलिसांचे वाहन ठेवण्यात आले होते.
चालकाने ब्रेकचा वापर केला नाही
माझ्या सुरक्षेत करण्यात आलेल्या कपातीची माहिती पोलिसांना देण्यात आली नव्हती, असे का करण्यात आले? आमच्या कारला धडक दिलेल्या ट्रक चालकाने जाणूनबुजून ब्रेक्सचा वापर केला नाही. सातत्याने माझी झेड प्लस सुरक्षा कमी होत आहे, तसेच अशा अपघातप्रसंगी धडक दिलेल्या ट्रकचालकाकडून ब्रेक्स लावले जात नाहीत, ही गंभीर आणि संशय निर्माण करणारी बाब असल्याचे तोगडिया यांनी म्हटले आहे.