बेपत्ता प्रवीण तोगडिया बेशुद्धावस्थेत सापडले
अहमदाबाद : विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष व प्रसिद्ध कॅन्सरसर्जन प्रवीण तोगडिया हे काल बेपत्ता झाल्यानंतर रात्री उशिरा एका पार्कमध्ये बेशुद्धावस्थेत सापडले. त्यानंतर त्यांनी मंगळवारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन भारतीय गुप्तचर संस्था (आयबी)वर अत्यंत गंभीर आरोप केलेत. त्यांनी सांगितले, की आपल्या एण्काउंटरचे षडयंत्र रचण्यात आलेले असून, आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार करत आहे. सरकारवर केलेल्या या आरोपानंतर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने तोगडिया यांची रुग्णालयात जावून भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने मोदी-शहा यांच्यावर टीकास्त्र डागले. तोगडिया यांच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा हे कटकारस्थान रचत आहेत, असा आरोपही हार्दिकने केला.
माझ्या एण्काउंटरचा आयबीचा डाव : तोगडिया
प्रविण तोगडिया बेपत्ता झाल्यानंतर हार्दिकने ट्वीटरवरून मोदी सरकारवर हल्ला चढविला होता. झेडप्लस सुरक्षा व्यवस्था असतानाही प्रवीणभाई तोगडिया बेपत्ता होतात, मग सामान्य माणसांचे काय होऊ शकते, याची कल्पनाही करवत नाही, असे त्याने नमूद केले होते. तोगडियांच्या जीवाला धोका आहे, असे त्यांनी स्वतःच याआधी सांगितले होते. पण, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात तोगडिया बेपत्ता झाले असते तर भाजपने संपूर्ण देशात हिंसाचार माजविला असता, असेही हार्दिकने नमूद केले होते. दरम्यान, प्रवीण तोगडिया यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांनी सांगितले की, आपणास घाबरविण्याचे काम गुजरातमधून सुरु झाले. मकर संक्रातीच्या दिवशी राजस्थान पोलिसांचे पथक आपल्या अटकेसाठी आले. मुंबईहून रात्री उशिरा घरी आलो आणि सकाळी पूजा करत असताना एक पोलिस कर्मचारी आला व सांगितले, की आपण ताबडतोब पळा, आपले एण्काउंटर केले जाणार आहे. आयबी व पोलिस आपल्या जीवावर उठले आहेत, असा आरोपही तोगडिया यांनी केला.