स्थानिक गुन्हे शाखेकडून गुजरातमधील म्होरक्या अटकेत ः कन्नड घाटात 31 लाखांच्या मालाची लावली होती परस्पर विल्हेवाट
जळगाव: मेहसाना येथून विशाखापट्टणम येथे अमोल दूध पावडरचा 31 लाख 17 हजार 758 रुपयांचा माल घेवून जात असतांना प्रवासात ट्रकचालक तसेच मालकाने साथीदारांच्या मदतीने माल परस्पर विक्री केल्याची घटना चाळीसगाव कन्नड घाटात घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयत स्थानिक गुन्हे शाखेने राजेंद्र अमरसिंग वाघेला (वय 67 रा. गोध्रा, गुजरात) यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वाघेला याची स्वतः तीन ट्रक आहेत. स्वतःच्या ट्रकमध्ये माल भरुन काही अंतरावर त्याची परस्पर विक्री करायची तसेच तोतया पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक बनून वाघेला याने साथीदारांच्या मदतीने देशभरात विविध ठिकाणी लाखोंचा माल असलेले ट्रक लुटल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे राजस्थानातील चार साथीदार फरार असून त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
काय घडली होती घटना
ट्रकचालक व मालक असलेल्या राजेंद्र वाघेला याने गुजरात राज्यातील मेहसाना येथून त्याच्या ट्रक (क्रमांक जी.जे.17, टी.टी.4006) मध्ये विशाखापट्टणम येथे पोहचविण्यासाठी अमोल दूध पावडरचा 14 टन 500 किलो एवढा, 31 लाख 17 हजार 758 रुपयांचा माल भरला. 21 सप्टेंबर 2013 ते 26 सप्टेंबर 2019 या काळात संबंधित माल त्याने विशाखापट्टणम येथे नियोजित ठिकाणी न पोहचता, मार्गात चाळीसगाव कन्नड घाटात, मालाची परस्पर विक्री केली होती. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
जळगाव एलसीबीकडून ‘दूध का दूध, पानी का पानी’
गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल सहा वर्षापासून यातील संशयित ट्रकचालक व मालक फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र पाटील यांना विविध गुन्ह्यांच्या अभ्यासाअंती या गुन्ह्यातील फरार संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी रविंद्र पाटील यांच्यासह सहाय्यक फौजदार अशोक महाजन, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, दादाभाऊ पाटील, दिपक पाटील, मुरलीधर बारी यांचे पथक रवाना केले होते. पथकाला संशयित गुजरात राज्यातील ग्रोधा येलि असून घरी असल्याची पक्की खबर होती. त्यानुसार पथकाने ग्रोधा येथील डी.एन.तुळास्मा, अरविंद भाई वरमन या पोलीस कर्मचार्यांच्या मदतीने संशयित राजेंद्र वाघेला यास अटक करण्यात आली.
वाघेला याने तोतया पोलीस अधीक्षक तसेच पोलीस उपअधीक्षक बनून महामार्गावर ट्रक तपासणीच्या बहाण्याने अनेक ट्रक लुटले आहेत. तर काही ठिकाणी मार्गावर उभ्या ट्रकची ताडपत्री फाडून, चालक नसल्याची संधी साधत लाखोंचा माल परस्पर दुसर्या ट्रकमधून त्याची विल्हेवाट लावली आहे. याप्रकरणी देशभरात वाघेला यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.