भुसावळ : गतवर्षी तलाठी पदासाठी शासनाने घेतलेल्या परीक्षेत बनावट हॉल तिकीट बनवून तोतया परीक्षार्थी बसवण्यात आल्याची घटना श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात घडली होती. या प्रकरणी चौकशीअंती शहर पोलिसात दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परीक्षेतील गैरप्रकार समोर आला असून तब्बल 17 महिन्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोतया परीक्षार्थी बसवला
जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक राहुलकुमार रतीलाल जाधव (31, रा.खोटे नगर, जळगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्याने आरोपी विजयसिंग महसिंग सुंदरडे, मदन मानसिंग गुसिंगे (राजेवाडी, पोस्ट शेळगाव, ता.बदनापूर, जि.जालना) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात भादंवि 420, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 जुलै 2019 रोजी शासनातर्फे तलाठी प्रवर्गासाठी परीक्षा घेण्यात आली होती. भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आरोपी विजयसिंग सुंदरडे हा परीक्षार्थी असताना त्याने आरोपी मदन गुसिंग याच्याशी संगनमत करीत त्याच्या नावाचे बनावट हॉल तिकीट तयार करून परीक्षा देत शासनाची फसवणूक केली होती. शासनाच्या चौकशीत ही बाब निदर्शनास आल्यानंतर तब्बल 17 महिन्यांनी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव पेठकर करीत आहेत.