नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशी देण्यात येणार नाही, असे पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी सांगितले आहे. त्यामुळे भारताला आता दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अंतिम निकाल येईपर्यंत फाशी देता येणार नाही, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अथवा माहिती मिळाली नव्हती. फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली असली, तरी जाधव हे सुरक्षित आहेत किंवा नाहीत, याबाबत जाणकारांनीही शंका उपस्थित केली होती. मात्र, जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत फाशी देण्यात येणार नाही, असे पाकिस्तानी उच्चायुक्त बासित यांनी सांगितले आहे.
कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी पाकिस्तान बांधील आहे, असे बासित यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. जाधव प्रकरणात पाकिस्तानने आपली बाजू मांडली आहे. त्यावर ठामही आहे तसेच राष्ट्रीय सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. जाधव यांना हेरगिरीप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. जाधव भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आहेत. ते कुणी सामान्य नागरिक नाहीत, असेही बासित म्हणाले. दरम्यान, कुलभूषण जाधव यांना गेल्या वर्षी पाकिस्तानने अटक केली होती. यावर्षी एप्रिलमध्ये पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. जाधव यांना शिक्षा सुनावल्यानंतर भारत सरकारने त्यांना राजनैतिक मदत मिळावी, अशी विनंती पाकिस्तानकडे केली होती. मात्र, त्यास पाकिस्तानने नकार दिला होता. अखेर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेऊन जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले होते. न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर जाधव प्रकरणाची सुनावणी सहा आठवड्यांत पूर्ण करण्यात यावी, अशी विनंती पाकिस्तानने न्यायालयाकडे केली आहे.