मुंबई। दिल्लीहून बोलवत नाहीत, तोपर्यंत मीच मुख्यमंत्रीपदी राहणार आहे, अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. यासोबतच रावसाहेब दानवेदेखील प्रदेशाध्यक्ष पदावर कायम असतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर काही विधानांमुळे महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन रावसाहेब दानवे यांची गच्छंती होणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. याशिवाय स्वत:देखील केंद्रात जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी केंद्रात जाण्याची तूर्तास शक्यता नाही. दिल्लीवरुन बोलावणे येत नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्रीपदावर राहणार आहे,’ असे त्यांनी म्हटले. याप्रसंगी त्यांनी सुकाणू समितीवरही जोरदार हल्लाबोल केला.
समितीचा पलटवार
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर सुकाणू समितीनी टीका केली आहे. शेतकर्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी धोरणे राबविणारेच देशद्रोही आहेत. शिवाय, स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्याऐवजी ब्रिटिशांची भलावण करणार्या संघटनांना गुरुस्थानी मानणार्यांनी शेतकर्यांना देशभक्ती शिकवू नये., असा पलटवार सुकाणू समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. शेतकर्यांची कर्जमाफीची मागणी अराजक पसरवणारी असेल, तर विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री अशी मागणी करुन अराजकच पसरवत होते काय?, असा सवाल डॉ. अजित नवले यांनी केला.
ही तर जीवाणू समिती!
शेतकर्यांसाठी एवढी मोठी कर्जमाफी केल्यानंतर कोणते राज्य जीवंत राहिले हे दाखवूनच द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विरोधकांना दिले. भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवर सडेतोड मत व्यक्त करत, विरोधकांवर हल्ला चढविला. स्वामिनाथन आयोग 2014 पासून पडून होता, मग भाजप सत्तेत आल्यावरच तो आठवला कसा? फक्त विरोधकच नाही तर विरोध करणार्या समित्यांनाही मुख्यमंत्र्यांनी टार्गेट केले. जणू काही नरेंद्र मोदींनीच स्वामिनाथन आयोग आणला आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. शेतकरी सुकाणू समितीचा उल्लेख त्यांनी जीवाणू समिती असा करत मला कोणाची औकात काढायची नाही, असेही ते म्हणाले. केवळ अराजकता माजवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची आंदोलकांकडून मागणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हे आधीच्या सरकारसारखे बेईमान सरकार नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
परिवर्तन फक्त मोदीच घडवणार !
खा. रावसाहेब दानवे यांच्या सततच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून नारळ देण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवणार नाही असे सांगत दानवेंची गच्छंती केली जाणार असल्याच्या वृत्तांना पूर्णविराम दिला. या देशात जर कोणी परिवर्तन घडवू शकते, तर ते नरेंद्र मोदी, असा लोकांना विश्वास आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेली व्यवस्था मोदींनी बदलली. विकसित भारतचे स्वप्न फक्त मोदीच पूर्ण करु शकतात. लोकांमध्ये विश्वास निर्माण केला तर भाजपला कधीच पराभवाचे तोंड पहावे लागणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
यांना अराजकता माजवायची आहे
मुख्यमंत्री म्हणाले, जे लोक निवडूनही येऊ शकत नाहीत ते या समितीत आहेत. पण त्यांना कधी विरोध केला नाही. मात्र संपूर्ण कर्जमाफीची मागणी करून यांना अराजकता माजवायची आहे. त्यांना फक्त लोकांना झुंजवत ठेवायचे होते. 15 ऑगस्टला झेंडा फडकवण्यास विरोध करणारे हे देशद्रोही आहेत, अशा शब्दांत टीका करत मला कोणाची औकात काढायची नाही. या शेतकरी आंदोलनामागे केवळ राजकीय हेतू होता, असा आरोपही त्यांनी केला.
इतकी वर्षे झोपले होते का?
विरोधी पक्षांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, आघाडी सरकारने खोदलेले खड्डे आम्ही बुजवत आहोत. विरोधकांच्या आंदोलनात कार्यकर्तेही दिसत नाहीत. स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी विरोधक करत आहेत. परंतु, 2004 सालीच स्वामिनाथन यांनी आपला अहवाल सादर केला होता. इतके वर्षे यांची सत्ता होती. मग, 2014 मध्येच तुम्हाला जाग आली का, इतकी वर्षे तुम्ही झोपले होते का? असा सवालसह त्यांनी उपस्थित केला.