मुंबई। 22 वर्षीय नितीन तोमर प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या मोसमाच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आगामी मोसमासाठी नवखा संघ असलेल्या टीम यूपीने त्याला 93 लाखांमध्ये खरेदी केले आहे. बेंगळुरु बुल्सने रोहित कुमारसाठी दुसर्या क्रमांकाची 81 लाख रुपयांची किंमत मोजली. जयपूर पिंक पँथर्सने मनजीत चिल्लरसाठी 75.50 लाखांची तिसर्या क्रमांकाची बोली लावली. आयपीएलप्रमाणेच प्रो कबड्डीमध्ये देखील यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूंना बोलीच लागली नाही. लिलावामध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर कशी बोली लागते याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु, सध्या पाकिस्तानला होत असलेला कडवा विरोध आणि दोन्ही देशांमधील सध्याचे बिघडलेले वातावरण पाहता कोणत्याही फ्रँचाइजीने पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न केला नाही.
नितीन तोमरने सर्व रेकॉर्ड मोडले
प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमात 12 संघ आहेत. पाचव्या मोसमात हरियाणा, यूपी, अहमदाबाद आणि तामिळनाडू या चार नव्या संघाचा समावेश करण्यात आला आहे. व्हीवो या लीगचा टायटल स्पॉन्सर असून या लीगला पुढील पाच वर्षांसाठी 300 कोटी रुपये देणार आहे. लिलावाच्या सुरुवातीला मनजीत चिल्लर सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. जयपूर पिंक पँथर्सने त्याला 75.5 लाखंमध्ये खरेदी केले. पण लिलावाच्या अखेरच्या टप्प्यात जेव्हा रेडरसाठी लिलाव सुरु झाला, तेव्हा नितीन तोमरने सर्व रेकॉर्ड मोडले आणि मनजीत चिल्लरला मागे टाकत सर्वात महागडा खेळाडू बनला.
प्रो कबड्डीच्या लिलावात 50 लाखांचा आकडा पार करण्यात 11 भारतीय खेळाडूंना यश मिळाले आहे. प्रो कबड्डीच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक बोली मोहित चिल्लवर 53 लाखांची लागली होती. तो विक्रम यंदा मोडित निघाला. यंदाच्या हंगामातही मोहितकडून अपेक्षा होत्या. मात्र त्याला फक्त 46 लाख 50 हजार रुपयेच भाव मिळू शकला. राकेश कुमारसाठी तेलुगू टायटन्सने 45 लाख रुपये मोजले. रोहित कुमारने मनजीतला मागे टाकले. बंगळुरु बुल्सने 83 लाखांमध्ये आपल्या संघात सामील केलं. के सेल्वामणीही मनजीतजवळ पोहोचला होता. पण जयपूरने त्याच्या 73 लाखांची अंतिम बोली लागली. पहिल्या टप्प्यात परदेश खेळाडूंमध्ये इराणचा अबाजार मोहाजेरमिघानी सर्वात महागडा खेळाडू ठरला. इराणच्या या डिफेंडरला, प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या सीझनमध्ये नव्याने दाखल झालेल्या गुजरातच्या संघाने 50 लाखांमध्ये विकत घेतले. प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामात भारताचा माजी कर्णधार राकेश कुमारवर 12 लाख 80 हजार रुपयांची सर्वाधिक बोली लागली होती. गेल्या तीन वर्षांत आणि चार हंगामांनंतर प्रो कबड्डीचा आलेख सातपट उंचावला आहे. संघमालकांना लिलावासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या निधीमध्ये देखील वाढ झाली आहे. पहिल्या हंगामातील 60 लाख रुपयांचा आकडा आता चार कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच जवळपास सात पट उंचावला आहे.