तोयबाचा एकही कमांडर जीवंत राहणार नाही!

0

सुरत : मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदची गेल्याच आठवड्यात पाक सरकारने नजरकैदेतून सुटका केली. या मुद्द्यावरून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. हाफिजच्या सुटकेनंतर जगभरातून पाकिस्तानचा निषेध झाला. मागील आठ महिन्यांमधील स्थिती पाहता, लष्कर-ए-तोयबाचा कोणताही कमांडर फार काळ जीवंत राहणार नाही, असे म्हणत जेटलींनी हाफिजच्या सुटकेवर पाकला सुनावले. ते गुजरातमधील सुरत येथे एका सभेत बोलत होते.

पाकवर जगभरातून टीका
जेटली म्हणाले, मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण व्हायला दोन दिवस असताना पाकिस्तानने हाफिज सईदची सुटका केली. त्यांच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. दहशतवादाचे समर्थन करणार्‍या देशाला आंतरराष्ट्रीय समुदायात कोणतेही स्थान नाही. भारतीय लष्कराच्या कारवाईचा संदर्भ देत लष्कर-ए-तोयबाचा कोणताही कमांडर फार काळ जीवंत राहत नाही, हे स्पष्ट झाले आहे. सईदच्या नजरकैदेत वाढ करावी, अशी याचिका पाकिस्तान सरकारकडून करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने पाकिस्तान सरकारची याचिका फेटाळून लावल्याने सईदची सुटका झाली, असे जेटली म्हणाले.