तोरणमाळ येथील स्वयंभू गोरक्षनाथ मंदिराच्या मालकी हक्काबाबत उफाळला वाद

0

शहादा । महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे व पर्यटकांचे आकर्षण असलेल्या तोरणमाळ येथील स्वयंभू गोरक्षनाथ मंदिर व त्यांच्या संपत्तीवर मालकी हक्काचा दावा सांगणार्‍या एका तथाकथित महाराजमुळे तोरणमाळ वातावरण गढूळ होत आहे. मंदिराची तोडफोड झाल्याचा कांगावा करणार्‍या या महाराजच्या कृत्यामुळे त्यात अधिकच भर पडल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी तोरणमाळ येथे जावून घटनेची माहिती घेत ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी ग्रामस्थांनी सदर महाराजाची चौकशी करून तत्काळ कारवाई करून येथील वातावरण गढूळ करणार्‍या या महाराजाची हकालपट्टी करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे बैठकीत करण्यात आली. बैठकीचे व्हिडियो चित्रण करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस अधिक्षकांकडे त्या तथाकथित महाराज विरोधात ग्रामस्थांनी लेखी तक्रार दिली आहे.

महाराजाबाबत कोडे?
तोरणमाळ येथे गोरक्षनाथांचे स्वंयभू मंदिर आहे. गोरक्षनाथ महाराजांचा काळातील हे मंदिर असल्याचे आख्यायिका आहे. मंदिराची देखभाल व सेवा गतअनेक वर्षांपासून तोरणमाळ ग्रामस्थ करीत आहे. या मंदिराची जुनी ट्रस्ट नोंद देखील आहे. मात्र त्याबाबत न्यायालयीन वाद आहे. येथील ग्रामस्थ मंदिराची मनोभावे पूजा अर्चा व देखभाल करीत आहे. मात्र 1 ते दीड वर्षापासून अचानक एक तथाकथित महाराजने या मंदिरात आपले बस्तान मांडले आहे. हा महाराज कोठून आला, कशासाठी आला याबाबत एक कोडे आहे.

ग्रामस्थासोंबत बैठक
मात्र हा तथाकथित महाराज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगून मंदिर व त्याची संपत्तीचा मालक असल्याचे सांगून ग्रामस्थांना धमकावत आहे. या तथाकथित महाराजामुळेे तोरणमाळाचे वातावरण खराब होत आहे. ग्रामस्थांनी महाराजाच्या विरोधात म्हसावद पोलिसात तक्रारही दिली आहे. तरीही महाराजचे उपद्रव्याप सुरूच आहेत. दरम्यान अज्ञात लोकांनी मंदिराची तोडफोड केल्याची तक्रार त्या महाराजाने पोलिसात केल्याने वादात अधिकच भर पडली. मात्र मंदिर तोडून नवीन बांधण्याचे आमिष दाखवून त्या महाराजाने मंदिराची तोडफोड केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

दिडेश ते 200 ग्रामस्थ हजर
या घटनेची पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दाखल घेत तोरणमाळ येथे जावून घटनेची माहिती घेत ग्रामस्थ व त्या महाराजांचीही त्यांनी बैठक घेतली. बैठकीत पोलीस पाटील ओल्सिंग नाईक, जीवन रावताळे, करमसिंग चौधरी, सुशांत चव्हाण, हेमराज तडवी, दिलीप रावताळे, विक्की चव्हाण, सुरेश नाईक, पहाद्सिंग नाईक, विजय रावताळे यांच्यासह सुमारे 100 ते 150 ग्रामस्थांनी त्या तथाकथित महाराजामुळे तोरणमाळमध्ये उद्भवत असलेल्या तक्रारीचा पाढा वाचला. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याचे आश्‍वासन ग्रामस्थांना दिले.