तोरणमाळ येथे पर्यटकांची गर्दी; सातपुड्याने पांघरला हिरवा शालू

0

तोरणमाळ । पावसाळी निसर्गरम्य वातावरण निर्माण झाल्याने सातपुडा पर्वतरांगेतील तोरणमाळ व उनपदेव पर्यटनस्थळी पर्यटकांची कमालीची गर्दी वाढली आहे. रोजच पर्यटक मोठ्याप्रमाणावर दाखल होत आहेत. पावसाळा सुरु झाल्याने पावसाचा रिपरिपचा आनंद लुटत आहेत.तोरणमाळला महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशातील पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यात शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या जास्त असते. बहुसंख्य पर्यटक आपआपल्या परिवारासह आलेले आहेत. सातपुडा हिरवागार झाल्याने पर्यटकाना आनंद वाटत आहे. सातपुडा पर्वतरांगेतुन वाहणारे धबधबे व दाट धुके ढगांची गर्दी मुख्य आकर्षण आहे. यशवंत तलाव, सिताखाई, खडकी पॉईंट या ठिकाणी गर्दी जास्त होत आहे. यशवंत तलाव हा काठोकाठ भरला आहे.

घाटात वाहनाची वर्दळ
सकाळपासुन तर सायंकाळपर्यंत घाटात वाहनाची वर्दळ सुरु आहे. तोरणमाळ परिसर गजबजला आहे. अक्षरशः हॉटेल विश्रामगृहे धर्मशाळा गर्दीने भरली आहे. पर्यटकाना रात्री राहायला जागा मिळत नाही. असंख्य पर्यटक प्राथमिक आरोग्य केंद्र व आश्रम शाळांचा आश्रय घेत आहेत. तोरणमाळला उन्हाळा व पावसाळातच पर्यटकांची गर्दी असते.शहादा व धडगाव तालुक्यात असलेल्या सिमेवर सातपुडा पर्वताचा तिसर्‍या रांगेत गरम पाण्याचा झरा म्हणून प्रख्यात असलेल्या उनपदेव या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होत आहे. तोरणमाळपेक्षा या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पर्यटकांची संख्या जास्त आहे. मालट्रक टॅक्टरसह अन्य वाहनांनी पर्यटक दाखल होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहली दाखल होत आहे.पर्यटक वनविभागाने बनवलेल्या बागेच्या ठिकाणी भेटी देवुन वनभोजनाचा आनंद घेत आहेत.

पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने मर्यादित हॉटेल विश्रामगृह असल्याने अडचण निर्माण होते आहे. श्रावण महिन्यापर्यंत गर्दी राहिल. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये जास्तीतजास्त सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो.
– रावल हॉटेलचे व्यवस्थापक, पी. डी. पाटील.