नागोठणे : येथील तोरणा इंग्लिश मिडीयम शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात बाहुला – बाहुलीचा विवाह सोहळा आज थाटामाटात पार पडला. बाल विद्यार्थ्यांना काही तरी नवीन आगळेवेगळे असे देण्याच्या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, संचालिका प्रणिता मोरे, मीनाताई मोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. विवाह सोहळ्यात प्रकाश मोरे यांनी कन्यादान केले. आंतरपाट धरलेले दोन बालविद्यार्थी, त्यांच्या बाजूला विद्यार्थ्यांसह जमलेला पालकवर्ग आणि मंगलाष्टकांच्या सूरांनी हा परिसर भारावून गेला होता. बाहुल्यांचे लग्न लागल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या निमित्ताने शाळा ते शिवाजी चौक अशी वरात काढण्यात आली. उपस्थित वऱ्हाड्यांना मिष्टान्नाचे वाटप करून या आगळ्यावेगळ्या विवाह समारंभाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका चित्रा खंडागळे, मेघना देशपांडे, माधुरी जगताप, अंकिता खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.