म्हसळा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्हसळा पंचायत समितीचे उपसभापती मधुकर गायकर यांच्या प्रयत्नाने म्हसळा तालुक्यांतील तोराडी, बंडवाडी येथील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे खाडीपट्टा प्रमुख इरफान पेवेकर, अतीक हजवाने, नासिर हजवाने, महमूद हजवाने, नाझिर मुकादम, मंगेश कातळकर, नरेश विचारे, शशि विचारे, विनोद नलावडे, शरद विचारे, राज कातळकर, राजू निगुडकर, रितेश विचारे आणि असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.
खाडी किनारपट्टीचा सर्वतोपरी विकास करणार
याप्रसंगी मधुकर गायकर यांनी सांगितले की, आमदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून या भागात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खर्च करण्यात आला असून, अजूनही लाखो रुपयांची विकासकामे प्रस्तावित आहेत. खाडी किनारपट्टीचा सर्वतोपरी विकास जि.प.अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना विश्वासात घेऊनच विकासकामे करण्याचे अभिवचन गायकर यांनी दिले. या वेळी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रमोद घोसाळकर, अलिशेठ कौचालि, दाजी विचारे, अंकुश खडस, माजी सभापती अनिता खडस, तालुकाअध्यक्ष नाजिम हसवारे, जि.प. सदस्य बबन मनवे, सभापती उज्ज्वला सावंत, संदीप चाचले, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.