मुंबई । अॅक्ट्रेस कृतिका चौधरीच्या मृत्यू प्रकरणी अंबोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तिचा पूर्वाश्रमीचा पती विजय द्विवेदीला आरोपी बनवले आहे. कृतिकाला विजयने काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांचा पुतण्या असल्याचे सांगितले होते. त्याचे हायप्रोफाइल लोकांशी संबंध असल्याने कृतिकालाही कधी शंका आली नाही. या तपासात नव्या नव्या बाबी समोर येत असून हत्येचे गुढ वाढले आहे.
बॉलिवूडची मोठी अॅक्ट्रेस बनवण्याचे आश्वासन
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कृतिकाला डोक्यात मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिस विभागाच्या सुत्रांनी कृतिकाबाबत एक अत्यंत दुःखद माहिती सांगितली आहे. त्यात कृतिकाला तिचा पूर्वाश्रमीचा पती विजयने फसवल्याचे उघड झाले आहे. तो कृतिकाला बॉलिवूडमध्ये मोठी संधी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन मुंबईत घेऊन आला होता. कृतिकाशी लग्न केल्यानंतर विजयने त्याच्या पहिल्या पत्नीला सोडून दिले होते. विजयने कृतिकाला बॉलिवूडची मोठी अॅक्ट्रेस बनवण्याचे आश्वासन दिले होते. त्याच अटीवर कृतिकाला तो मुंबईत घेऊन आला होता.
गोविंदा, श्वेता तिवारीसह अनेकांना दिला धोका
2012 मध्ये विजयला मुंबई पोलिसांनी उघडे पाडले होते. सेलिब्रिटींना धोका देणारा आरोपी असल्याचे तेव्हा उघड झाले होते. त्याने चीट केलेल्या सेलिब्रिटींमध्ये गोविंदा, टीव्ही अॅक्ट्रेस श्वेता तिवारी, बालाजी टेलीफिल्म्सची एकता कपूर, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांचा समावेश होता. काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून त्यांच्या नावाने कोणीतरी चीट करत असल्याचे सांगितले होते. चव्हाण यांनी हे प्रकरण क्राइम ब्रँचकडे सोपवले होते. त्यावेळी विजयला लोखंडवाला परिसरात एका इमारतीतून अटक केले होते.
कलमाडींनीही दिले होते पोलिसांच्या ताब्यात
त्याला क्राइम ब्रँचने अटक केली त्यावेळी त्याच्याबरोबर कृतिकालाही फ्लॅटमधून अटक करण्यात आली होती. या घटनेने कृतिका खचून गेली होती. विजयने तिला दगा दिला हे समजल्यानंतर तिने त्याला घटस्फोट दिला होता. दिल्लीमध्ये विजयने तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडीशी संपर्क केला होता. जनार्दन द्विवेदीचा पुतण्या असल्याचे सांगत त्याने राष्ट्रकुल स्पर्धेचा मोफत पास मागितला होता. त्यावेळी कलमाडी यांना संशय आल्याने त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात देत तुरुंगात पाठवले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पहिल्या पत्नीला सोडले आणि कृतिकाबरोबर लग्न केले.