तो अमेरिकेहून आला तेव्हा घरात आढळला आईचा सांगाडा!

0

मुंबई : आईला मुंबईत ठेवून पैसे कमाविण्यासाठी पत्नी व मुलांसह अमेरिकेत स्थायिक झालेला मुलगा तब्बल दीड वर्षानंतर घरी आला. आईने दरवाजा उघड नाही म्हणून त्याने दार तोडून आत प्रवेश केला असता, बेडवर आईचा सांगाडा दिसून आला. ही घटना घडली आहे; मुंबईतील उच्चभू्रंची वस्ती समजल्या जाणार्‍या अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील एका इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये! जन्म देणार्‍या आईकडे केलेल्या या अक्षम्य दुर्लक्षाची घटना उघड झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

दीड वर्षांनंतर आली आईची आठवण
आशा केदार साहनी (वय 63) असे या मृत मातेचे नाव आहे. लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील वेल्सकॉड टॉवरच्या दहाव्या मजल्यावर त्या एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा रितूराज साहनी आयटी इंजिनियर आहे. तो पत्नी आणि मुलांसह अमेरिकेतच राहतो. दीड वर्षानंतर तो मुंबईतील घरी आला असता त्याने दरवाजा ठोठावला पण, आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने दरवाजा तोडला असता, बेडवर आशा साहनी यांचा सांगाडा आढळला. रितुराजने पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून सांगाडा गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात पाठवला. आशा साहनी यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मला एकटे राहायचे नाही, वृद्धाश्रमात जाऊ दे!
आशा साहनी यांचे पती केदार साहनींचे 2013 मध्ये निधन झाले. मुलगा रितुराज अमेरिकेत स्थायिक झाल्याने त्या मुंबईत एकट्याच राहत होत्या. एप्रिल 2016 मध्ये त्यांनी मुलाला शेवटचा फोन केला होता. मला एकटे राहायचे नाही. एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन राहते. मी मानसिक तणावाखाली आहे, असे त्यांनी रितुराजला फोनवर सांगितले होते. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, फ्लॅटचा दरवाजा आतून बंद आढळल्याने कदाचित आशा साहनी यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हत्या, आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू अशा तिन्ही बाजूंनी पोलिस तपास करत आहेत.