‘तो आवाज माझा नाही, चौकशी करा’; विश्वजित राणे यांची मागणी

0

पणजी : काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्हायरल केलेली राफेल डील संबंधीच्या ऑडिओ क्लीपशी माझा काहीच संबंध नाही. माझ्या आवाजाची कुणी तरी नक्कल केली असेल किंवा आवाजात फेरफार करून हा खोटा ऑडिओ बनविला असेल, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे केली असल्याचेही त्यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

‘राफेल संबंधीची सर्व माहिती माझ्या बेडरूममध्ये आहे असे मला पर्रीकर यांनी सांगितले आहे असा संवाद विश्वजित यांच्या आवाजात व्हायरल झालेल्या ऑडिओत आहे. तसेच निलेश काब्राल यांनी अभियंत्यांची भरती करताना आपलीच माणसे भरली आहेत आणि बाबू आजगावकर यांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पडून असल्यामुळे ते नाराज आहेत, असे ते क्लिपमध्ये बोलले आहे. एका माध्यमाच्या प्रतिनिधीशी फोनवर बोलत असताना ऑडिओचे कॉल रेकॉर्डींग करण्यात आले असावे, असे त्यांनी सांगितले.

परंतु, राफेल डील विषयावर आपली कधी चर्चाच झालेली नाही. त्यामुळे फायली कुठे आहेत या गोष्टी मला माहितच नाहीत. हा काँग्रेसचा डाव असून मला व्यक्तिगत त्रास देणे हा एकमेव उद्देश ठेवून काँग्रेसनेच रचलेले हे कारस्थान आहे. मुख्यमंत्री सचिवालयात जाऊन फायली हाताळू शकतात हे पाहिल्यावर काँग्रेसचे संतुलन बिघडले व त्यांनी माझ्यावर टीका सुरू केली असल्याचे ते म्हणाले.