तो ताजमहालच, तेजोमहाल नाही!

0

नवी दिल्ली : आग्रा येथील ताजमहाल म्हणजे तेजो महाल किंवा शंकराचे मंदीर नाही. ताजमहालाची निर्मिती बादशहा शाहजानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मृती जपण्यासाठीच केली होती, असा अहवाल केंद्रीय पुरातत्त्व विभागाने लेखी स्वरूपात आग्रा न्यायालयात सादर केला आहे.

ताजमहाल पूर्वी शंकराचे मंदीर
2015 मध्ये सहा वकिलांनी आग्रा न्यायालयात एक याचिका दाखल केली होती ज्या याचिकेत ताजमहाल हे पूर्वी शंकराचे मंदीर होते, त्यामुळे येथे आरती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. ताजमहालात काही खोल्या बंद आहेत त्या उघडण्यात याव्या अशीही मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. याच याचिकेवर भारतीय पुरातत्त्व खात्याचे म्हणणे काय आहे हे न्यायालयाने जाणून घेतले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबररोजी होणार आहे. ताजमहालाची वास्तू ज्या परिसरात उभी आहे त्याच परिसरात एक मशीद आहे. या मशिदीत दर शुक्रवारी बडी नमाज अदा होते.

केंद्रीय पुरातत्त्व खाते आणि पुराणवस्तू खात्याकडे देशातल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचमुळे ताजमहालाच्या संदर्भातली याचिका न्यायालयापुढे आली तेव्हा न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व खात्याकडे उत्तर मागितले; याच याचिकेला उत्तर देताना, ताजमहाल ही वास्तू शहाजानने बांधली असून, त्याजागी आधी मंदीर होते किंवा या वास्तूचे नाव तेजोमहाल होते असे कोणतेही पुरावे मिळत नाहीत असे म्हटले आहे. सतराव्या शतकात बादशहा शाहजान याने त्याची पत्नी मुमताजच्या स्मृती जपण्यासाठी या वास्तूची निर्मिती केली आहे, असेही पुरातत्त्व खात्याने म्हटले आहे. एवढेच नाही तर 2015 मध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानेही ताजमहालाच्या जागी शंकराचे मंदीर होते किंवा या वास्तूचे नाव तेजो महाल होते असे कोणतेही पुरावे मिळत नसल्याचे स्पष्ट केले आहे.