‘तो ’ मराठा मंत्री कोण?

0

मुंबई । राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे सुतोवाच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत दिले. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक मंत्र्यांचे खांदेपालट होणार आहेत, तर जवळपास 6 मंत्र्यांचं खातं जाण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकारमधील मराठा चेहरा असलेल्या एका मंत्र्याला तामिळनाडूचे राज्यपालपद देण्याची चर्चा सध्या भाजपमध्ये सुरु आहे.

‘साईडट्रॅक’ला टाकण्याच्या हालचाली
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडेच तामिळनाडूचंही राज्यपालपद आहे. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त भार कमी करुन महाराष्ट्रातील मराठा मंत्र्याला तामिळनाडूचं राज्यपालपद देऊन, ‘साईडट्रॅक’ करण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत. त्यामुळे चर्चेत असलेला हा मराठा मंत्री कोण, या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या फडणवीस सरकारमध्ये भाजपचे आघाडीचे मराठा चेहरे म्हणून चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, संभाजी पाटील-निलंगेकर, सुभाष देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं.

डोईजड होवू नये म्हणून
सुभाष देशमुख व विनोद तावडे यांची राजकीय पार्श्‍वभूमि व वाटचार लक्षात घेता. विनोद तावडे यांचे नावच राज्यपाल पदाच्या चर्चेत पुढे आहे. मुंबईत भविष्यातील राजकारणात बहूजन वदाचा मुद्दा महत्वाचा ठरु पाहत असेल तर आतापासूनच तावडे यांचे महत्व कमी केलेले बरे, असा विचार फडणवीस गटाकडून होत आहे. त्यामुळे सुभाष देशमुखांच्या तुलनेत व्यवहारवादी नसलेले तावडे फडणवीस गटाचे लक्ष्य सहज ठरू शकतात अशीही चर्चा आहे.

तावडेच निशाण्यावर?
या आघाडीच्या मंत्र्यांना वगळता अन्य मराठा मंत्र्यांना राज्यपालपदी धाडण्याची सूतराम शक्यता नाही. शिवाय संभाजी पाटील यांनी आपण मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री असल्याचं जाहीर सांगितलं होतं, त्यामुळे ते सुद्धा मंत्रिमंडळात राहणार हे जवळपास निश्चित आहे. राहिला प्रश्न चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांचा. तर चंद्रकात पाटील हे थेट भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून हलवण्याची शक्यता नाही. दुसरीकडे चर्चा येऊन थांबते ती विनोद तावडे यांच्या नावावर. तावडे यांचा पदवीचा वाद, शिक्षकांची नाराजी आणि सध्याचा मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ, यामुळे त्यांच्या नावाची चर्चा भाजपमधीलच त्यांच्या स्पर्धकांनी सुरु केली की काय असा प्रश्न आहे.