धुळे । राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून आ. अनिल गोटे यांनी लक्षवेधी लावण्यासाठी पैसे मागत असल्याची क्लीप वाजवण्यात आली होती. या क्लीपच्या खरेपपणाबद्दल मी उद्या बोलेन असे आमदार अनिल गोटे यांनी काल सांगितले आहे. यानुसार आज शनिवारी आमदार गोटे यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली. यात आमदार गोटे यांनी ‘होय त्या सीडीतील आवाज माझाच आहे. सत्य कबूल करायला मी घाबरत नाही!’ अशी सुरुवात करीत आ.अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीने त्यांच्या आणि भिसे यांच्यातील संवादाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाचे खंडन केले. मात्र आपण लक्षवेधीसाठी कुठल्याही प्रकारे पैशांची मागणी केलेली नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
मुख्यमंत्र्यांना पत्र देणार : याप्रसंगी आमदार गोटे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “सट्टयाच्या पेढ्या चालविणे, रॉकेलचा काळाबाजार करणे असे भुरटे धंदे करणार्या चिंधी चोरांना फार काही मोठे घबाड हाती सापडले असे वाटते. अरे तुम्ही स्वत:सारखे मला समजता का? मला इज्जत आहे आणि गेली 50 वर्षे उभा महाराष्ट्र मला चांगल्याप्रकारे ओळखतो आहे. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा कधीही इन्कार केला नाही, करणार नाही. मला मिळालेले अनन्य साधारण धाडस ही परमेश्वराची देणगी आहे. भल्याभल्यांना सत्य स्वीकारणे व पचवणे कठीण जाते. तुम्ही काय सांगता मीच मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे आिाण सांगणार आहे की, जो काय तपास करावयाचा असेल आणि शहानिशा करावयाची असेल ती कराच! असेही आ.अनिल गोटे यांनी निक्षून सांगितले.
सीडी नोव्हेंबर महिन्यातील
शनिवारी पत्रकार परिषदेत आ.गोटे म्हणाले की, जी काही माझ्या संभाषणाची सिडी आपण पत्रकारांना दिली ती सिडी नोव्हेंबर महिन्यातीलच आहे आणि गेले 6 महिने सोशल मिडीयावर फिरते आहे. पण तुमच्या नेत्यांकडे फार पूर्वीच ती आलेली आहे. राष्ट्रवादीच्या एका उतावळया नेत्याने मला सांगितले की, आम्ही तुम्हाला अडचणीत आणू. मी तत्काळ सांगितले की, जरूर आणा, मी तुम्हाला चॅलेंज देतो. खरच तुमच्यात जर जोर असेल तर आणांच. ही घटना मागच्या आर्थिक संकल्पीय अधिवेशनाच्या काळातील आहे. म्हणजे मार्च, एप्रिल मधील आणि तुम्हाला आता जाग आली. तुम्ही काय ‘एसआयटी’ची मागणी करता? माझेच तुम्हाला जाहीर आव्हान असल्याचे सांगत प्रतिआव्हान दिले.
सीडी नीट ऐका !
आ.गोटे म्हणाले की, “होय! ऑडीओ क्लिपमधील शब्द माझेच आहेत. व त्याच्या आधीचे वाक्य नीट व शांतपणे ऐका त्यात म्हटले आहे की, मला तुमचा एक रूपया नको. मला परमेश्वराने भरपूर दिले आहे आणि ती करंसीची गोष्ट आहे. 8 नोव्हेंबर रोजी जुन्या नोटा रद्द झाल्या. डिसेंबरमधील अधिवेशनाच्या काळात तुम्ही आलात तर, नागपूरमध्ये वापरण्यासाठी नवीन करंसी आणा. याचा अर्थ असा की, पुन्हा तुमचा माझ्या डोक्याला ताप नको. जो मोपलवार आपल्या बायकोच्या घटस्फोटासाठी 32 कोटी रूपये देतो, तो आपली अब्रू वाचवायला काय दोन-पाच लाख देणार आहे का? हे भुरटे धंदे तुमचे आहेत. आपल्याला अनेक आयएएस व आयपीएस मित्रांनी मोपलवारला क्षमा करा असे सांगितले.
1995 पासून तक्रारी
पुढे आ.गोटे म्हणाले की, 1995 मध्ये मुंबई क्राईम ब्रांचला मोपलवारने केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात 78/95 या क्रमांकाचा गुन्हा दाखल आहे. त्यावेळी तीन कर्मचारी निलंबित करण्यात आले. मात्र मोपलवारला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी वाचविले. मोलपवार हा तेलगी स्टँप घोटाळ्यातील आरोपी आहे. त्याने मुद्रांक विभागाचा वरिष्ठाधिकारी असतांना अब्दुल करीम लाडसाहेब तेलगी याचे बनावट स्टँप अधिकृत करुन विक्री करण्यास मदत केली आहे. मोपलवार संदर्भात अधिक माहिती देतांना आ.गोटे म्हणाले की, मोपलवाराच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आपण 1995 पासून तक्रारी करीत आहोत. विधानसभेत सर्वात अगोदर लक्षवेधी देखील आपण मांडली होती. मात्र अध्यक्षांनी ती नाकारल्याने औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.