पिंपरी (प्रतिनिधी) – ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव खुप मोठा असतो. त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांनी करून घेतला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक हे वयाने मोठे असले तरी मनाने लहान मुलांसारखे असतात. त्यामुळे या मोठ्या मुलांना सांभाळून घ्यावे, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी काढले. सव्विसाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या वर्धापनदिन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ‘जिव्हाळा’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
नगरसेवक सुरेश भोईर, चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाजी जगताप, उपाध्यक्ष सूर्यकांत पारखी, कार्यवाह गोपाळ भसे, सहकार्यवाह चंद्रकांत कोष्टी, ‘जिव्हाळा’ विशेषांकाचे संपादक नंदकुमार मुरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृष्णाजी जगताप यांनी प्रास्ताविक केले.
आशयसंपन्न ‘जिव्हाळा’ विशेषांक!
प्रा. तुकाराम पाटील पुढे म्हणाले की, ‘वयोवृद्धा मनोयुवा’ हे ब्रीद अंगीकारून चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद क्रियाशील आहेत, ही अभिनंदनीय बाब आहे. व्यक्तिचित्रणे, कथा, संस्था परिचय, वैचारिक लेख, प्रवासवर्णने, आध्यात्मिक निरूपणे, कविता असा भरगच्च वाचनीय मजकूर यांनी नटलेला ‘जिव्हाळा’ हा विशेषांक मनोरंजनाबरोबरच अप्रतिम अनुभवांचा अनमोल खजिना आहे. आशयसंपन्न साहित्याने समृद्ध असलेला, व्याकरण आणि शुद्धलेखनाची अचूकता साधलेला हा सर्वांगसुंदर विशेषांक म्हणजे ज्येष्ठांच्या समृद्ध जीवनाचा चढता आलेख कसा असावा, याचा उत्तम वस्तुपाठ आहे.
त्या सभासदांचा सत्कार!
‘जिव्हाळा’ विशेषांकाच्या निर्मितीस साहाय्य करणार्या कुमार बोत्रे, वैशाली बोत्रे, प्रदीप गांधलीकर यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच ज्या सभासद दांपत्यांच्या वैवाहिक जीवनाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारार्थींच्या वतीने प्रातिनिधिक मनोगते व्यक्त करण्यात आली. नारायण दिवेकर, जयमाला विभुते, रमेश डोंगरे, चंद्रकांत पारखी, सुदाम गुरव यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. रमेश इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. उषा गर्भे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.