त्यांना पप्पू म्हणू नका!

0

निवडणूक आयोगाची भाजपला सूचना

अहमदाबाद : निवडणुकीच्या जाहिरातींमध्ये पप्पू नावाचा उल्लेख भाजप करत असून, निवडणूक आयोगाने यावर आक्षेप घेतला आहे. आयोगाने भाजपला पत्र पाठवून अशाप्रकारचा उल्लेख करू नका, अशी तंबी दिली आहे. निवडणूक प्रचाराशी संबंधित साधनांद्वारे पप्पू नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करण्यावर आयोगाने आक्षेप घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गुजरातमध्ये प्रचाराच्या तोफा धडाधडत असताना निवडणूक आयोगाने भाजपला पाठवलेल्या पत्रात, निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिराती, होर्डिंग, पोस्टर्सवरून पप्पू नाव हटवण्यास सांगितले आहे.

असा आदेश योग्य नाही : भाजप
गुजरात राज्य निवडणूक आयोगाने, अशाप्रकारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधणे मर्यादेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने भाजपाच्या प्रचार मोहिमेचे निरीक्षण केल्यानंतर म्हटले आहे की, एका खास व्यक्तीकडे इशारा करत अपमान करण्याच्या हेतूने पप्पू नावाचा वापर केला जात आहे. दरम्यान, भाजपाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या प्रचारात कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नसल्याने अशा प्रकारचा आदेश देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.