त्यांना संघातून वगळणार नाही

0

नवी दिल्ली। भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतल्यावर धोनी आणि युवराजसिंगच्या संघातील भवितव्याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. पण, या दोघांच्या चाहत्यांना निवड समितीचे प्रमुख एम. के. प्रसाद यांनी चांगली बातमी दिली आहे.

धोनी आणि युवराजला अचानक संघातून वगळता येणार नाही. असे एम.के.प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. धोनी आणि युवराजची इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी झाली नव्हती. त्यामुळे या दोघांच्या बाबतीत प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. प्रसाद म्हणाले की, या मुद्द्यावर कधी आणि कसा निर्णय घ्यायचा हे सगळ्यांना माहीत आहे. कुठलीही तयारी नसताना युवराज आणि धोनीच्या बाबतीत अचानक काही निर्णय घेता येणार नाही.

युवराज, धोनीला पर्याय कोण?
योग्य वेळ येताच या दोघांच्या संदर्भात कर्णधार आणि प्रशिक्षकांशी चर्चा करु. या दोघांना पर्याय असल्याशिवाय वगळता येणार नसल्याचा मुद्दा प्रसाद यांनी मांडला. प्रसाद म्हणाले की, या दोघांना इंग्लंडमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. ज्या काही चुका झाल्या होत्या त्यात सुधारणा होत आहे. युवराज आणि धोनीसारख्या दिग्गज खेळाडूंसाठी कुठला पर्याय आहे हे पहावे लागेल. या दोघांच्या जागेवर आधी पर्यायी खेळाडू शोधावे लागतील. कुठल्या तयारीविना निर्णय घेतल्यास त्याचा उलट परिणाम होण्याची शक्यता आहे.