‘त्या’काळात महिलांना स्वयंपाकघरापासून दूर ठेवण्याची पद्धत चुकीची

0

पुणे । पूर्वी मासिक पाळी दरम्यान महिलांना स्वयंपाक घरात प्रवेश दिला जात नव्हता. त्या काळात महिलांना आराम मिळवा हा त्या मागील उद्देश होता. मात्र, कालांतराने मासिक पाळीला निषिद्ध मानून महिलांना स्वयंपाकघर आणि देवदेवतांपासून दूर ठेवण्याची पद्धत प्रचलित झाली. मासिक पाळी ही निषिद्ध गोष्ट नाही. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते स्वीकारण्याची वेळ आता आली आहे. असे मत अभिनेता अक्षय कुमार याने व्यक्त केले.सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अ‍ॅन्ड कम्युनिकेशन (एसआयएमसी) यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सिनेमा : समाज व सांस्कृतिक प्रबोधनचे एक माध्यम’ या विषयावरील चर्चासत्रात तो बोलत होता. यावेळी झाम्बियाच्या राजदूत जैनबा जॅग्ने, डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. रुचा जग्गी आदी उपस्थित होते.

मुरगणांथम यांची जीवनगाथा
अक्षय कुमार याने यावेळी त्याच्या आगामी ‘पॅडमन’ या चित्रपटाविषयी माहिती दिली. हा चित्रपट अरुणाचल मुरगणांथम यांच्या जीवनावर आधारित आहे. अरुणाचल हे देशाचे ‘मासिक पाळी मॅन’ म्हणून ओळखले जातात. या चित्रपटाद्वारे त्यांचा जीवन प्रवास उलगडण्यात आला आहे.

82 टक्के पॅड्स वापरत नाहीत
अक्षय म्हणाला की, सद्यपरिस्थितीत देशातील 82 टक्के महिला मासिक पाळीत सॅनिटरी पॅड्स वापरत नाहीत. पाळीदरम्यान त्या राख किंवा मातीचा वापर करतात. देशातील सद्य परिस्थिती पाहता महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे तो म्हणाला.

पुरोगामी सिनेमाचे लक्षण
सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अ‍ॅन्ड कम्युनिकेशनच्या संचालक डॉ. रुचा जग्गी म्हणाल्या, चित्रपट सृष्टीतील मुख्य प्रवाहातील कलाकार मासिक पाळी या विषयावर बोलतो, ते पुरोगामी सिनेमाचे लक्षण आहे.

जगभर ‘मासिक पाळी’ हा विषय गंभीर
झाम्बियाच्या राजदूत जैनबा जॅग्ने म्हणाले, चित्रपटाचा विषयामुळे प्रभावीत झाले आहे. ‘मासिक पाळी’ हा विषय केवळ भारतामध्ये गंभीर नाही, तर जगभरात त्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. या विषयावर जगभरातच लोकशिक्षणाची गरज आहे. मासिक पाळी निषिद्ध नाही. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिलांना मासिक पाळी आली नसती, तर कोणाचाही जन्म झाला नसता. हा चित्रपट झाम्बियामध्ये प्रदर्शित व्हावा, यासाठी प्रयत्न करेन!