मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकारच्या तपासावरून महाराष्ट्र विरुद्ध बिहार पोलीस असे चित्र निर्माण झाले होते. त्यातच बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत अवमानजनक भाष्य केले होते. त्यानंतर गुप्तेश्वर पांडेय यांनी स्वेच्छा निवृत्ती जाहीर करत जेडीयू पक्षात प्रवेश करत राजकारणात उडी घेतली. त्यातच भाजपने जेडीयूशी युती केल्याने भाजपवर देखील आता आरोप होऊ लागले आहे. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेय यांना जर उमेदवारी मिळाली तर भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या प्रचाराला जातील का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. मात्र जेडीयूसहित भाजपने देखील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात गुप्तेश्वर पांडेय यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या उमेदवाराचा प्रचार करावा लागेल या भीतीनेच जेडीयू, भाजपने गुप्तेश्वर पांडेय यांना उमेदवारी दिली नाही असे गृहमंत्र्यांनी सांगितले. पांडेय यांना जर उमेदवारी दिली असती तर भाजपला महाराष्ट्रातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले असते असेही देशमुख यांनी म्हटले आहे.