‘प्राइड ऑफ महाराष्ट्रीय मंडळ’ पुरस्कार प्रदान
पुणे : पोलिस खात्याबद्दल आज नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून आदर आहे. महाराष्ट्रात परराज्यांतून 48 रेल्वे येतात. त्या येताना भरून येतात आणि जाताना रिकाम्या जातात. ही येणारी कोण आहेत, याची माहिती नाही. पण, त्यानंतरही राज्यात शांतता राहते. त्यामुळे गणवेशातील ही माणसे महत्त्वाची आहेत, असे कौतुकोद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले.
महाराष्ट्रीय मंडळातर्फे देण्यात येणार्या कै. रमेश दामले स्मृती ‘प्राइड ऑफ महाराष्ट्रीय मंडळ’ हा पुरस्कार ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. माजी पोलिस आयुक्त श्रीकांत बापट, मंडळाचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आणि मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले या वेळी उपस्थित होते.
बाहेरच्या राज्यांमधून दररोज जे लोंढे महाराष्ट्रात आणि मुंबईत येतात ते कुठे गेले? यात गुन्हेगार कोण? पोटासाठी कोण आलंय? याचा शोध घेतला जातो का? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला. पोलीस आहेत म्हणून कायदा आणि सुव्यवस्था आहे, त्यामुळे पोलिसांचा आदर केला पाहिजे असेही त्यांनी म्हटले.
मुंबईमध्ये मराठी माणसांच्या शिक्षण संस्था उभ्या राहात नाहीत. त्यामुळे मुंबई शहर अमराठी लोकांना आंदण देऊन टाकलंय की काय, असा सवाल त्यांनी केला. फक्त गुजराती मारवाडींच्या संस्था का उभ्या राहतात? मराठी माणसांच्या संस्था का उभ्या राहात नाहीत? शिक्षण संस्था चालविण्याचा अनुभव असलेल्यांनी मुंबईमध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे. गुजराथी, मारवाडी आणि सिंधी यांच्या संस्था तेथे उभ्या राहात आहेत आणि आपल्या लोकांच्या संस्था उभ्या राहात नाहीत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
गोखले म्हणाले, करियरची सुरवात महाराष्ट्रीय मंडळामध्ये झाली. व्यायाम, क्रीडा, शिक्षण यात योगदान देणार्या या संस्थेने आता कलेतही पाऊल टाकले आहे.या वेळी फणसळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. दामले यांनी प्रास्ताविक व आभार मानले.