लंडन। ब्रिटनमधली यूके इंडिपेन्डेन्स पार्टी म्हणजेच यूकीपने आपल्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात बुरख्यावर बंदी आणण्याचे आश्वासन दिले आहे. सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी आणली जाईल, कारण बुरखा हा सूर्यापासून मिळणार्या ड जीवनसत्वाला रोखतो, असे कारण त्यांनी यासाठी दिले आहे. त्यांच्या या आश्वासनाने सध्या एकच खळबळ उडवून दिली आहे.
येत्या 8 जून रोजी इंग्लंडमध्ये मध्यावधी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. बुरखा परिधान केल्याने व्यक्तीची ओळख लपविली जाते. यामुळे संवाद साधण्यास अडचण निर्माण होते. रोजगाराच्या संधी कमी होतात. कौटुंबिक हिंसाचाराचे पुरावे झाकले जातात आणि शरीरासाठी आवश्यक असलेले ड जीवनसत्त्व मिळण्यातही अडथळा येतो, असे युकिपच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. मँचेस्टर हल्ल्यानंतर काही दिवसांनीच युकिपने निवडणूक प्रचार मोहीम पुन्हा सुरू केली आहे. अलिप्तपणा आणि दडपशाहीची अशी प्रतीके तसेच यापासूनचा सुरक्षा धोका आम्ही स्वीकारणार नाही. ओळख लपविण्याचा कसलाही मानवाधिकार नाही, असे यात म्हटले आहे. महिलांना कामात आणि वैयक्तिक आयुष्यात पूर्णपणे सहभाग घेता यावा, यादृष्टीने त्यांच्यासाठी समान संधी आम्हाला हव्या आहेत, असेही या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
युकिपच्या या आश्वासनावर आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे. याशिवाय महिला आणि समलिंगी व्यक्तिंना दुय्यम समजणार्यांना देशात प्रवेश करण्यास रोखण्यासाठी इमिग्रेशन प्रणालीत सोशल अँटिट्यूड टेस्ट म्हणजेच सामाजिक दृष्टिकोन चाचणीचा समावेश करण्याचेही आश्वासन युकिपने दिले आहे.