… त्यासाठी माझा हातच पुरेसा आहे!

0

मोहाली । पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यामध्ये धोनीने वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीने 44 चेंडूंमध्ये 79 धावा केल्या. यातल्या 47 धावा तर धोनीने शेवटच्या 4 षटकांमध्ये फटकावल्या. 198 धावांचा पाठलाग करत असताना धोनीला चेन्नईला 193 धावांपर्यंतच पोहोचवता आले. त्यामुळे चेन्नईचा 4 धावांनी पराभव झाला. चेन्नईचा या सामन्यामध्ये पराभव झाला असला, तरी धोनीने मात्र सगळ्यांची मने जिंकली. मैदानात असताना धोनीला पाठीचा प्रचंड त्रास होत होता. फलंदाजी करताना याचा त्याला भरपूर त्रास झाला. मात्र, मैदानावर अगदी खंबीरपणे तो उभा होता. धोनीने 44 चेंडूंच्या आपल्या खेळीत 6 षटकार आणि 5 चौकार मारले. शेवटच्या 5 षटकांमध्ये चेन्नईला विजयासाठी 76 धावांची गरज होती आणि ते असंभव वाटत होते. 18 आणि 19 व्या षटकांमध्ये 19-19 धावा केल्यावर शेवटच्या 6 चेंडूत 17 धावांची गरज होती. पण चेन्नईला 12 धावा करता आल्या. पाठदुखी असतानाही धोनीने एका हाताने षटकार मारला. धोनीच्या या षटकाराचे सगळ्यांनीच कौतुक केले आहे. दुखापतीमुळे पाठीची स्थिती खूप वाईट होती पण देवाने मला ताकद दिली. शॉट खेळताना मला पाठीचा जास्त वापर करण्याची गरज पडली नाही. यासाठी माझे हातच पुरेसा आहे, अशी प्रतिक्रिया धोनीने सामन्यानंतर दिली. पाठीची दुखापत फारशी गंभीर नाही. नेमके काय झाले आहे ते मला माहिती आहे, त्यामुळे मी लवकर फिट होईन, असा विश्‍वास धोनीने व्यक्त केला आहे.

धोनीजवळ आला युवराज
सामना सुरू असतानाच धोनीच्या पाठीला दुखापत झाली. त्यामुळे चेन्नई संघातील एक सदस्य मैदानात येऊन धोनीच्या पाठीचे मॉलिश करत होता. धोनीवर उपचार सुरू असताना तो मैदानातच झोपला होता. तेव्हा युवराज धोनीजवळ आला आणि त्याने धोनीच्या डोक्यावरून हात फिरवून त्याचं सांत्वन केले. धोनी आणि युवराजच्या मैत्रीबाबत नेहमीच चर्चा होत असते. 2011 सालचा विश्‍वचषक जिंकवण्यात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अंतिम सामन्यामध्ये धोनीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आले तर युवराजला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देण्यात आला. 2015 सालच्या विश्‍वचषक स्पर्धेमध्ये मात्र युवराजला संघाबाहेर ठेवण्यात आले. धोनीनेच युवराजला संघाबाहेर ठेवल्याचे आरोपही त्यावेळी झाले होते.

लेकीचा लाडिक हट्ट
चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानावर षटकारांची आतषबाजी करत होता, त्याच वेळी धोनीच्या लाडक्या लेकीला म्हणजे झिवाला वडिलांच्या भेटीची ओढ लागली होती. झिवाची ही गोंडस इच्छा कॅमेराने टिपली आहे. धोनीने सहा चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 79 धावांची खेळी उभारुनही चेन्नई सुपरकिंग्सला रविवारच्या आयपीएलच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबकडून चार धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. धोनीची ही टोलेबाजी सुरू असतानाच झिवाला आपल्या पित्याला भेटावंसं आणि त्याला कडकडून मिठी मारावीशी वाटत होती. झिवाने तिची आई साक्षी आणि धोनी कुटुंबीयांच्या मित्राकडे आपल्या लाडक्या पापाला मैदानातून घेऊन येण्याचा हट्ट धरला होता. पापा को बुलाओ अशी मागणी झिवा करत होती. आपण वडिलांना कशी मिठी मारणार, हेही ती सांगताना व्हिडिओत दिसते. झिवाने धरलेल्या या लाडिक हट्टाचा व्हिडिओ धोनीने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर झिवाचा व्हिडिओ चाहत्यांची पसंती मिळवत आहे.