चोरुन चित्रीकरण झालेल्या प्रकारापासून जिल्हाधिकारी अनभिज्ञ
चोरुन चित्रीकरण प्रकरण
पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचीही चौकशी
जळगाव । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव विमानतळावर चोरुन करण्यात आलेल्या चित्रीकरणाप्रकरणाबाबत मंगळवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला विचारणा झाल्याची तसेच विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्यासह पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणार्या अधिकारी कर्मचार्यांची चौकशी करण्यात आली असून व्हिडीओची पडताळणी करण्यासाठी मोबाईलमध्ये चित्रीकरण करणार्या आमदारांच्या दोन स्वीय सहाय्यकासह मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाचा मोबाईल जप्त करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.धुळे येथे विविध विकासकामांच्या शुभारंभसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी जळगाव विमानतळावर आले होते. चौघे विमानतळावर विमानातून उतरत असताना कुणीतरी सर्व एका मोबाईलमध्ये चित्रीत केले होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुप्तचर यंत्रणा अर्लट झाली होती. सोमवारी दिवसभर पोलिसांसह गुप्तचर यंत्रणांच्याही बैठका झाल्या होत्या.
‘त्या’ स्वीय सहाय्यकांची जोरदार चर्चा
दरम्यान, पंतप्रधान जळगाव विमानतळावर आले असता त्याठिकाणी विमानतळाच्या पहिल्या केबिनमध्ये भिंतीलगत विद्यमान मंत्री व आमदारांचे काही स्वीय सहाय्यक व वाहन चालक उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ आणि फोटो घेतले. या सर्व स्वीय सहाय्यक आणि चालकांचे मोबाईल जळगाव पोलिसांनी तपासकामी जप्त केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच व्हायरल झालेले चित्रीकरणाचा व्हीडीओ करणारा जामनेर येथील अभिषेक (पूर्ण नाव माहिती नाही) नामक असल्याची माहिती मिळाली आहे.
कर्मचार्यांमध्ये पसरली कारवाईची भिती
पोलिसांनी आणि गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्यांनी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या सीसीटीव्हीत काही जण जागा सोडून पळालेेले दिसून येत आहे. ज्यांनी कर्तव्यात कसूर केला, अशाही काही पोलीस अधिकारी व कर्मचार्यांशी चौकशी करण्यात येत आहे. यात काही जणांची चौकशी करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. बंदोबस्तात समावेश असलेल्या इतर कर्मचार्यांमध्ये कारवाईच्या भितीने धडकी भरली आहे. नेमके कर्मचारी कोण याचीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये जोरदार चर्चा होती.
जिल्हाधिकारी प्रकारापासून अनभिज्ञ
संबंधित चित्रीकरणाबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून विचारणा झाली का याबाबत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत कुठलीही माहिती नसून तशी तक्रार आले नसल्याचे सांगितले. राज्यभर खळबळ उडाली असताना या प्रकारापासून जिल्हाधिकारी अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तपास पूर्ण झाल्यावर माहिती देतो
संबंधित चित्रीकरण प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना या प्रकरणात कुणाचे मोबाईल जप्त तसेच काही तपास झाला का याबाबत विचारले असता, त्यांनी संबंधित प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर माहिती देण्यात येईल असे सांगितले.