‘त्या’ अकरा जणांना जामीन मंजूर

0

यवत । दौंड नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेवकासह 11 जणांच्या त्रासाला कंटाळून दौंड शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते निसार शेख यांनी 1 फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली याप्रकरणी त्या 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बारामती सत्र न्यायालयाने त्यांना अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे.

निसार शेख यांनी आत्महत्या करण्यापुर्वी त्यांच्या जबाबाची व्हिडिओ क्लिप मित्र परिवार व नातलगांना पाठवली होती. त्यात दौंड नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक वसीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, मशिदिचे विश्‍वस्त आदी अकरा जणांची नावे घेतली होती. त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. या सर्वांविरोधात दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेख यांच्या नातलगांनी सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत निसार शेख यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे दौंड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

पोलिसांनी शेख यांचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागरात ठेवला होता. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ठेवल्याने शेख यांच्या नातेवाईकांनी निसार शेख यांचा दफनविधी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान 11 जणांनी बारामती सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी घेण्यात आली होती. मात्र, निर्णय देण्यासाठी गुरुवारची तारीख देण्यात आली होती. या 11 जणांना अटकपुर्व जामिन बारामती सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे, अशी माहिती दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.