मुंबई । मालाड पश्चिम येथील रेल्वेस्थानकाजवळच्या मारुती मंदिर कारवाईप्रकरणी संबंधित बेजबाबदार अधिकार्यांना निलंबित करण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक संदीप पटेल यांनी केली आहे. महापालिकेने न्यायालयात हे मंदिर 1948 पूर्वीचे असल्याची माहिती दिली नव्हती. ती न्याययंत्रणेपासून दडवून ठेवली, असा आरोप पटेल यांनी केला आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकार्यांचे निलंबन करण्यात यावे, असे पटेल यांनी मागणीत म्हटले आहे.
मालाड पश्चिमेकडील आनंद मार्ग व ईश्वरलाल पारेख मार्ग रुंदीकरणासाठी कारण देत महापालिकेने कारवाई केली होती. मात्र, हे मंदिर 1948 पूर्वीचे असून, ते तोडण्यापूर्वी त्याचे स्थलांतर करणे आवश्यक होते. मात्र, पालिकेच्या अधिकार्यांनी तसे न करता थेट तोडण्याची कारवाई केली. मंदिर तोडणार्या संबंधित बेजबाबदार अधिकार्यांवर आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे, असे पटेल यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी हे मारुती मंदिर तोडण्याची कारवाई करण्यात येणार होती.