‘त्या’ अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी – नगरसेवक संदिप वाघेरे

0

पिंपरी : प्रभाग क्रमांक 21 मधील अनेक वर्ष वापरात नसलेले व्यापारी गाळे, मिळकती यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हे गाळे, मिळकती मार्फत महापालिकेला उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रभाग स्तरावर भाडे तत्वावर देण्यासाठीचा ठराव 1 नोव्हेंबर रोजी ग क्षेत्रीय समितीमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. तसेच प्रभागातील सांस्कृतिक सभागृह, छोटे हॉल, रखवालदार यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या रूम यांचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतीत अधिकार्‍यांच्या मार्फत महिन्यातून एकदा पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला होता. परंतु ठराव मंजूर होऊन 11 महिन्याचा कालावधी होऊनही अद्यापपर्यंत कोणतीही झाली नाही. हा प्रशासनाचा बेशिस्त कारभाराचा उत्कृष्ट नमुना आहे, त्यामुळे शिस्तभंग करणार्‍या या अधिकार्‍यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नगरसेवक संदिप वाघेरे यांची मागणी यांनी केली. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन सादर केले.

मिळकतींची देखभाल करणे गरजेचे

नगरसेवक वाघेरे यांनी सांगितले की, महापालिकेच्या भूमी जिंदगी विभागाचे सहा.आयुक्त, ग क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहा.आयुक्त व महा.आयुक्त यांना याबाबत गेल्या 11 महिन्यात 5 ते 6 वेळा स्मरणपत्र देऊन वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. महापालिकेचा जकातनाका बंद झाल्याने उत्पन्नाचे स्त्रोत बंद झालेले आहेत. महापालिकेचा मिळकत कर, पाणीपट्टी व शासनाच्या अनुदानावर अवलंबून आहे. अशावेळी महापालिकेच्या मिळकतींची व्यवहारदृष्ट्या योग्य ती देखभाल करून नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र तरीही ग क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारी तथा सहा. आयुक्त वारंवार लेखी पाठपुरावा करूनही या ठरावाची अंमलबजावणी करत नाहीत, याची खंत वाटते. यामुळे या अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करीत आहोत.