नवी दिल्ली: मध्यप्रदेश मधील गायब झालेल्या आमदारांना कोरोना विषाणूची लागण झाली असावी असा दावा काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. मध्यप्रदेश मध्ये भाजपा सत्तास्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेस सरकार हार मानायला तयार नाही. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शुक्रवारी राज्यपालांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर राजीनामा देवून गायब सर्व आमदार शुक्रवारी परतणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र ते आमदार परतले नाही.
बंडखोर आमदार शुक्रवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतील असा अंदाज होता. मात्र हे आमदार परतले नसल्याने मध्यप्रदेशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. काँग्रेसनेते दिग्विजय सिंह म्हणाले की, बंडखोर आमदारांना बंगळुरू येथे कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यामुळे या आमदारांची बंगळुरू येथेच तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कमलनाथ यांनी राज्यपालांच्या भेटीत सांगितले की, भाजपकडून आमदारांना कैद करण्यात आले आहे. अशा स्थितीत बहुमत चाचणी कशी घेता येईल, असा प्रश्न कमलनाथ यांनी उपस्थित केला. तसेच अमित शाह यांना सांगून कैदेत असलेल्या आमदारांना मुक्त करावे अशी मागणी कमलनाथ यांनी राज्यपालांकडे केली आहे.