शहादा । तालुक्यातील लोणखेडा बायपास रस्त्या लगत सिध्दी विनायक मंदिरा समोरील युनियन बँकेचे एटीएम मशिन फोडून त्यातुन सुमारे 3 लाख 12 हजार रुपये जबरी चोरीप्रकरणी गुराका जि. पलवल (हरियाणा) येथील मुख्य सूत्रधार ताहीर ऊर्फ राजू गफूरखान यास निमज (म.प्र ) येथून शहादा पोलिसांनी अटक केलीआहे त्यास न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेतील आरोपीचे अन्य सहा साथीदार फरार झाले आहेत दोन महिन्यानंतर आरोपींचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांसमोर होते आव्हान
विशेष म्हणजे एटीएम लगत हॉटेल असून रात्री उशिरा एक वाजेपर्यंत ते सुरू असते शिवाय सूतगिरणी कामगारांची रेलचेल सुरू असते वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम फोडून लाखोंचा ऐवज चोरून नेल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती पोलिसांनी चोरट्याचा मागोवा घेण्यासाठी नंदुरबार येथुन श्वानपथक व ठसेतज्ञना पाचारण केले होते. मात्र त्यातून पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते घटनेचा उलगडा होण्यासाठी उपअधीक्षक एम.बी.पाटील ,पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पथकही पाठविली होती.
मध्यप्रदेश पोलिसांनी साधला संपर्क
पोलिसांचा तपास सुरू असतानाच केंट पोलिस ठाणे निमज, जिल्हा-निमज (मद्यप्रदेश) येथील पोलिसांनी हरियाणा राज्यातील एटीएम फोडून जबरी चोरी करणार्या टोळीचा मोरक्या ताहीर ऊर्फ राजू गफूरखान रा.गुराका ता.हातींन जिल्हा, पलवल (हरियाणा) यास अटक केली होती गफूरखान याने महाराष्ट्रात शहादा येथेही एटीएम फोडल्याची कबुली दिल्याने निमज पोलिसांनी तात्काळ शहादा पोलिसांशी संपर्क साधून आरोपीची माहिती दिली पोलिस उपनिरीक्षक दीपक बागुल ,पोकाँ.भरत बाविस्कर यांच्या पथकाने निमज येथे जाऊन आरोपी ताहीर ऊर्फ राजू गफूरखान यास शहादा येथे काल दि. 28 रोजी आणले त्यास न्यालालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे त्याचे अन्य सहा साथीदार फरार झाले आहेत तपास उपनिरीक्षक दीपक बागुल करीत आहेत.
अशी झाली होती चोरी
लोणखेडा चाररस्ता लगत वर्दळीच्या ठिकाणी सिध्दी विनायक मंदिरासमोर युनियन बँकेचे एटीएम आहे. दि.23 मार्च 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास साधारण एक ते चार वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यानी गॅस कटरच्या साह्याने एटीएमचा दरवाजा कापून त्यातून 3 लाख 12 हजार रुपये चोरुन नेल्याची घटना घडली होती सकाळी सव्वा आठ वाजेचा सुमारास युनियन बँकेचे एटीएम फोडल्याची सुचना भ्रमणध्वनीद्वारे बँक व्यवस्थापक श्रीधर राऊत याना मिळाली. त्यांनी त्वरीत उपविभागीय पोलीस अधिकारी एम.बी.पाटील यांना घटनास्थळी पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, प्रभारी पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक बडगुजर, एस.बी.शिंदे पोलीस कर्मचारी मनोज सरदार, जलाल शेख, भटु धनगर, स्वप्निल गोसावी, विकास कापूरे, देवा गावीत, मनोज महाजन घटनास्थळी दाखल झाले होते.