‘त्या’ कामांना संघाचाच नकार

0

नागपूर । संघाच्या रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील सुरक्षा भिंत आणि सिमेंटचा रस्ता बांधण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने आता संघानेच या प्रस्तावाला नकार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे आम्ही संघासाठी काही करतो हे दाखविण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजप नेत्यांवर पुन्हा एकदा नामुष्कीची वेळ येण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेचा प्रस्ताव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात सुरक्षा भित आणि सिमेंट रस्ता बांधकामाच्या 1.37 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली होती.सुरक्षा भिंतीवर 48 लाख 36 हजार 54 रुपये, तर रस्त्यासाठी 89 लाख 2 हजार 790 रुपये खर्च येणार होता. चालू आर्थिक वर्षांत महापालिकेने 48 लाख 36 हजार रुपयाची तरतूद बाळासाहेब देवरस पथ त्रिवेणी स्मारकासाठी व हेडगेवार स्मृती मंदिर परिसर सौंदर्यीकरणासाठी केली होती. ही रक्कम सुरक्षा या भिंतीसाठी खर्च करण्यात येणार होती. महापालिकेच्या निधीतून सार्वजनिक उपयोगितेची कामे करणे बंधनकारक असताना एका संस्थेच्या कामासाठी निधी खर्च केला जात असल्याने सामाजिक संघटनांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती.